पुणे : "कोणी कोणाला पाडा असे म्हणू शकत नाही, अशी परिस्थिती पुन्हा राज्यात येणार नाही," असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
पुणे जिल्ह्यातील २१ पैकी १८ जागा सध्या महायुतीकडे असल्याचे सांगत, सर्व २१ जागा जिंकण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या विविध योजनांचा प्रचार करत मतदारांपर्यंत पोहोचत असल्याचेही त्यांनी सांगितले.
महायुतीतील एकतेबाबत बोलताना मुंडे म्हणाल्या, "उमेदवारीबाबत कोणताही मतभेद नाही. मैत्रीपूर्ण लढतीच्या ठिकाणी वरिष्ठ नेते योग्य निर्णय घेतील." कोल्हापुरातील मधुरीमा राजे यांच्या उमेदवारीबाबत त्यांनी "असा निर्णय पक्ष आणि व्यक्तीसाठी खच्चीकरण करणारा ठरेल," असे मत व्यक्त केले.
राज्यातील मागील अडीच वर्षांत भाजप सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे मतदार महाआघाडीला नकार देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जातीय किंवा धार्मिक ध्रुवीकरणाद्वारे मते मिळवणे नव्या पिढीसाठी अयोग्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या वेळी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/०४/२०२४ ०६:१६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: