दोन कोटींहून अधिक मुद्देमालासह डिझेल तस्कर जेरबंद
रत्नागिरी -गुहागर तालुक्यातील अंजनवेल जेटी परिसरात पोलिसांनी धडक कारवाई करून मच्छीमार बोटीच्या माध्यमातून सुरू असलेल्या मोठ्या डिझेल तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश केला. या कारवाईत नऊ संशयितांना अटक करण्यात आली असून, सुमारे दोन कोटी पाच लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस गस्तीदरम्यान अंजनवेल जेटी किनारी रात्री एका मच्छीमार नौकेतून मोटर आणि पाईपच्या साहाय्याने अवैधरित्या डिझेल तस्करी होत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून नऊ संशयितांना ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी मच्छीमार बोट, बोटीवरील मोटर व पाईप, टँकर, बलेनो कार यांच्यासह २५,००० लिटर डिझेल जप्त केले. याशिवाय आरोपींच्या ताब्यातील नऊ मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत.
ही कारवाई चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजमाने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ढेरे आणि त्यांचे कर्मचारी, तसेच गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. गुहागर परिसरातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी डिझेल तस्करी विरोधी कारवाई मानली जात आहे.
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाचा तपशीलवार पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील आरोपींविरुद्ध संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तस्करी रॅकेटचे मुख्य सूत्रधार आणि त्यांचे संबंध शोधण्याचे काम पोलीस करत आहेत.
Reviewed by ANN news network
on
११/१८/२०२४ ०२:५१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: