"राजकीय पक्षांच्या उदासीनतेला ठेवीदारांचे नोटाद्वारे उत्तर"
पुणे : डीएस कुलकर्णी (डीएसके) गटाच्या ३२ हजार ठेवीदारांची १२०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्यानंतरही राजकीय पक्षांनी दाखवलेल्या असंवेदनशीलतेला उत्तर म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत 'नोटा'चा पर्याय वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघात आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी ही घोषणा केली. चैतन्य सेवाभावी संस्था (असोसिएशन ऑफ डीएसके व्हिक्टिम्स) आणि हिंदू महासंघाच्या सहकार्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
"नोटा हा घटनात्मक अधिकार असून, ठेवीदार, त्यांचे कुटुंबीय आणि हितचिंतक असे एकूण दीड लाख मतदार या निवडणुकीत नोटाचा वापर करतील," असे ठेवीदार संघटनेचे प्रतिनिधी यांनी स्पष्ट केले.
२०१७ पासून सुरू असलेल्या या लढ्यात कोणत्याही राजकीय पक्षाने ठोस पावले न उचलल्याने हा निर्णय घेण्यात आला. मेळाव्यात राजकीय पक्षांना संधी देऊनही त्यांनी दुर्लक्ष केल्याचे ठेवीदार संघटनेने नमूद केले.
डीएसके प्रकरणात १६ हजार कोटींची मालमत्ता केवळ ८२८ कोटींना विकण्यात आली असून, या प्रक्रियेत ठेवीदारांच्या हिताचा विचार करण्यात आला नसल्याचेही संघटनेने नमूद केले.
पत्रकार परिषदेला मनोज तारे, विवेक परदेशी, विद्या घटवाई, सूर्यकांत कुंभार, नितीन शुक्ल, अदिती जोशी तसेच ठेवीदार संघटनेकडून दीपक फडणवीस, शरद नातू, सुधीर गोसावी आणि नितीन मोरे उपस्थित होते.
हिंदू महासंघ ठेवीदारांच्या लढ्यात सातत्याने सहभागी असून, लोकशाही पद्धतीने नोटाच्या माध्यमातून आपला निषेध नोंदवण्याचा निर्णय घेतल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
Reviewed by ANN news network
on
११/१८/२०२४ ०१:२७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: