फडणवीस-अजित पवार यांच्या प्रयत्नांना यश; काटे यांचे बंड शमले
चिंचवड - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राजकीय चित्र आज स्पष्ट झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नाना काटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना पाठिंबा जाहीर केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रयत्नांना यश आले असून महायुतीची ताकद वाढली आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शंकर जगताप यांनी नाना काटे यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा केल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.
"अजित पवार यांच्याशी दोन दिवसांपूर्वी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी आज सकाळी झालेल्या चर्चेनंतर, तसेच कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून हा निर्णय घेतला आहे," असे नाना काटे यांनी सांगितले. महायुतीचा धर्म पाळत शंकर जगताप यांच्या विजयासाठी आपण काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शंकर जगताप यांनी काटे यांच्या या निर्णयाचे स्वागत करत राज्यातील महायुती सरकारच्या स्थैर्यासाठी घेतलेल्या या निर्णयाबद्दल आभार व्यक्त केले.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: