"पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला ४५ जागांचा विश्वास"
पुणे (प्रतिनिधी): पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुती ४५ जागा जिंकेल असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय चित्राचा आढावा घेतला.
सध्या पश्चिम महाराष्ट्रात युतीचे ४२ तर आघाडीचे १६ आमदार असल्याची माहिती देत मोहोळ यांनी या भागातील ५८ मतदारसंघांपैकी ४५ जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. भाजप २६, शिवसेना १२, राष्ट्रवादी काँग्रेस १९ आणि जनसुराज्य पक्ष २ जागांवर निवडणूक लढवत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
"लोकसभा निवडणुकीत दहा जागा कमी झाल्या असल्या तरी विरोधकांचे फेक नॅरेटिव्ह आणि संभ्रम दूर करू शकलो," असे मोहोळ यांनी सांगितले. शहरी आणि ग्रामीण भागात महायुती उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मागील काळातील आघाडी सरकारच्या कारभारावर टीका करताना मोहोळ यांनी कल्याणकारी योजना आणि विकास प्रकल्पांना दिलेल्या स्थगितीचा मुद्दा उपस्थित केला. याउलट, युती सरकारच्या काळात विकासाला गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे, प्रवक्ते संदीप खर्डेकर, संजय मयेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/१८/२०२४ ०९:०१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: