पुणे महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांची प्रशासनाला भेट, भेटवस्तू आणि शुभेच्छांचा वर्षाव
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी महानगरपालिकेच्या विविध अधिकाऱ्यांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्यासाठी स्वतः बनवलेल्या आकर्षक भेटवस्तू भेट दिल्या. पुणे महानगरपालिका आणि आयटच संस्थेच्या संयुक्त उपक्रमांतर्गत शहरातील आठ इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भेट देऊन त्यांच्या कार्याचा आभार मानला.
गंज पेठेतील आचार्य विनोबा भावे विद्यालय आणि कवडेनगर येथील संत अशोक विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थेचे प्रतिनिधी यांनी महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त, शिक्षण उपआयुक्त आणि अन्य अधिकारी यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक पणत्या, पेंटिंग कार्ड, भेटवस्तू देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
अधिकारी आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद साधण्याचा हा एक महत्त्वाचा प्रसंग ठरला. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख सांगायला प्रोत्साहित केले, ज्यावर विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आपल्या छंद आणि भविष्याच्या ध्येयांची ओळख करून दिली. काहींनी पुण्यात शिक्षण घेऊन आर्टिस्ट, लॉर्डर किंवा प्रोफेसर होण्याची इच्छा व्यक्त केली.
शाळेच्या मुख्याध्यापक नित्शगंधा गोगटे आणि सीमा शर्मा यांनी शाळेत चालवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. फिटनेस, खेळ, करिअर मार्गदर्शन आणि सीएसआरच्या सहकार्याने दिले जाणारे मध्यान्ह भोजन अशा अनेक सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जात आहेत.
आयटच संस्थेच्या गायत्री शिंगारे यांनी या भेटीचा उद्देश आणि संस्थेचे कार्य अधिकाऱ्यांसमोर मांडले. यावेळी शिक्षण उपआयुक्त आशा राऊत आणि आयटच संस्थेचे इतर प्रतिनिधीही उपस्थित होते.
पुणे महानगरपालिका आणि आयटच संस्थेच्या सहकार्याने सन २०१५ पासून शहरातील आठ इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवल्या जात आहेत.
Reviewed by ANN news network
on
१०/२९/२०२४ ०३:४६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: