दिव्यांगांच्या जिद्दीला सलाम; अजय-सागरने पूर्ण केली ३७५८ किमीची सायकल स्पर्धा
मुंबई : दृष्टीहीन सायकलपटू सागर बोडके (नाशिक) आणि अजय लालवानी (मुंबई) यांनी 'रेस अक्रॉस इंडिया' सायकल स्पर्धेत नव्या जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. टँडम सायकलवर चार पायलट रायडर्स - उल्हास कुलकर्णी (नाशिक), अंबरीश गुरव (दापोली), सुशील सारंगधर (मुंबई), आणि शिवम खरात (मुंबई) यांच्या मदतीने त्यांनी ३७५८ किमीचे अंतर ९ दिवस १२ तास ४ मिनिटांमध्ये पूर्ण केले. या विक्रमाची नोंद ब्रावो बुक ऑफ इंटरनॅशनल अवॉर्ड्समध्ये झाली आहे.
अंबरीश गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार, टँडम सायकलवर पायलट रायडर पुढील सीटवर बसून हँडल, गिअर, ब्रेक यांचे नियंत्रण सांभाळतो, तर मागे दिव्यांग स्टोकर बसून पायलटला सहाय्य करतो. दोघांमधील समन्वय आवश्यक असतो. ही आव्हानात्मक स्पर्धा १० ऑक्टोबर २०२४ रोजी श्रीनगर येथे सुरू झाली. 'रेस टू व्हिजन' नावाने अजय आणि सागर यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धकांचे हालचाल जीपीएस प्रणालीद्वारे ट्रॅक करण्यात आली.
ऊन, पाऊस, थंडी आणि रस्त्यावरील विविध अडचणींवर मात करत ही स्पर्धा पूर्ण करणे म्हणजे मानसिक व शारीरिक क्षमतेचा कस लावणारे एक आव्हान होते. सहकाऱ्यांच्या सहाय्याने आणि कठोर सरावाने ही आव्हानात्मक सायकल राईड यशस्वी करण्यात आली.
स्पर्धेत सहभागी झालेल्या टीम रेस टू व्हिजनला संकेत भानोसे, डॉ. अनिल बारकुल, रामेश्वर चव्हाण, सतिश जाधव, लखन लालवानी, महेश दाभोळकर, संतोष संसारे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. तसेच हॅपी ह्युमन्स फाउंडेशन, बीडच्या बारकुल हॉस्पिटल, निओ रोटरी क्लब मुंबई, ठाणे रोटरी क्लब, समर्थ व्यायाम मंदिर दादर, नासिक सायकलिस्ट, गरुडझेप संस्था आणि अन्य संस्थांनी सहकार्य दिले.
दृष्टीहीन सायकलपटू अजय आणि सागर यांची श्रीनगर ते कन्याकुमारी सायकल राईड अनेकांसाठी प्रेरणादायक ठरणारी आहे.
Reviewed by ANN news network
on
१०/२९/२०२४ ०३:०१:०० PM
Rating:

.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: