गॅरंटी कार्ड'चा मुद्दा घेऊन भापकर मैदानात; चिंचवडमध्ये चतुरंगी लढत
पुणे (प्रतिनिधी) : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक चित्र अधिक रंगतदार बनले असून, माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी आज दि. २९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे या मतदारसंघात आता चौरंगी लढत होणार आहे.
भापकर यांच्या प्रवेशामुळे महायुतीचे शंकर जगताप, महाविकास आघाडीचे राहुल कलाटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्यातील लढत अधिक रोचक बनणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी नगरसेवक असलेल्या भापकर यांचा लोकसंपर्क दांडगा असल्याने त्यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघातील समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निवडणुकीपूर्वी भापकर यांनी अभिनव पद्धतीने ११ मुद्द्यांचे 'गॅरंटी कार्ड' जाहीर करत इतर उमेदवारांना आव्हान दिले होते. या कार्डमध्ये त्यांनी मराठा आरक्षण, निळ्या पूररेषेतील घरांचे संरक्षण, भ्रष्टाचार निर्मूलन, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील सुधारणांसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश केला होता.
"दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्यास आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी असल्याचे 'गॅरंटी कार्ड'मध्ये नमूद केले आहे," असे भापकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सांगितले.
चिंचवड मतदारसंघात यापूर्वी त्रिकोणी लढत अपेक्षित होती. मात्र, भापकर यांच्या प्रवेशाने आता निवडणुकीतील स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः त्यांनी जाहीर केलेल्या 'गॅरंटी कार्ड'मुळे मतदारांमध्ये नवी चर्चा सुरू झाली आहे.
Reviewed by ANN news network
on
१०/२९/२०२४ ०४:४५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: