विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
पिंपरी चिंचवड : मराठी रंगभूमी दिन, पु. ल. देशपांडे यांची जयंती आणि दिवाळीच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनतर्फे आयोजित २६ व्या स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी, ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती मुख्य संयोजक प्रवीण तुपे आणि सहसंयोजक राजीव तांबे यांनी दिली.
तत्पूर्वी, सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवड सायन्स पार्कच्या तारांगण सभागृहात 'मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा - पुढे काय?' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि ज्येष्ठ भाषा तज्ञ व इतिहास संशोधक संजय सोनवनी सहभागी होणार आहेत. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन राजन लाखे करणार आहेत.
स्वरसागर महोत्सवाच्या मुख्य उद्घाटनानंतर पं. व्यंकटेश कुमार यांचे गायन आणि श्रद्धा शिंदे - हर्डीकर यांचा कथक नृत्याविष्कार रसिकांसमोर सादर होणार आहे. बुधवारी, ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता स्नेहल सोमण यांचा सामूहिक नृत्यरंग, डॉ. शर्वरी डीग्रजकर - पोफळे यांचे शास्त्रीय गायन, आणि स्वरस्वप्न - व्हायोलिन समूह वादनाचे कार्यक्रम होणार आहेत.
गुरुवारी, ७ नोव्हेंबर रोजी समारोपाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजता विजय तेंडुलकर यांच्या सुप्रसिद्ध ‘सखाराम बाईंडर’ या नाटकावर आधारित ‘मॅड सखाराम’ या विडंबन नाटकाची विशेष प्रस्तुती मंगेश सातपुते यांच्या दिग्दर्शनाखाली होईल. याशिवाय, डॉ. सुमेधा गाडेकर यांच्या ‘महाराष्ट्राची संत परंपरा’ या नृत्यनाटिकेचे सादरीकरण, तसेच मिलिंद ओक आणि राहुल सोलापूरकर यांचा ‘ब्लॅक अँड व्हाईट’ या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम होईल.
सर्व कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून, पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना एक सांस्कृतिक मेजवानी अनुभवण्याची संधी मिळणार आहे, असे संयोजक प्रवीण तुपे आणि राजीव तांबे यांनी सांगितले.
Reviewed by ANN news network
on
१०/२९/२०२४ ०५:३६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: