पुणे: पुणे शहर पोलिसांनी दोन वर्षांपासून फरार असलेल्या खून आरोपीला अखेर जेरबंद केले आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या प्रकरणात आरोपी दीर्घकाळ पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, पोलिसांनी अचूक माहितीच्या आधारे आरोपीला पकडण्यात यश मिळवले आहे.
आरोपी धनराज शेरावत (वय २३ वर्षे, रा. म्हसोबा नगर, सणसवाडी तळेगाव रोड, ता. शिरूर, जि. पुणे) याने सणसवाडी परिसरात २०२२ मध्ये खून केल्याचा गुन्हा दाखल होता. पोलिसांनी याप्रकरणी भादवि कलम ३०२, १४१, १४३, १४७, १४८, १४९, ३४१, ३२४ अंतर्गत गुन्हा नोंदवला होता. आरोपी दीर्घकाळ फरार राहिल्यामुळे त्याचा तपास करणे कठीण झाले होते.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपी अमरधाम स्मशानभूमीजवळ, माळवाडी, हडपसर येथे असल्याचे समजले. युनिट-०५ च्या पोलीस पथकाने सापळा रचून २८ ऑगस्ट २०२४ रोजी त्याला अटक केली. पुढील तपासासाठी त्याला शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यशस्वी कारवाईत युनिट-०५ गुन्हे शाखा, पुणे शहर यांच्या पथकाने सहभाग घेतला. या पथकाचे नेतृत्व पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी केले. त्यांच्या सहकार्याने सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर व इतर पोलीस अंमलदारांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: