भिवंडीतील शाळेत लाचखोरी प्रकरण: मुख्याध्यापिका आणि लिपिक अटकेत
भिवंडी : भिवंडीतील राबिया गर्ल्स हायस्कूलमध्ये लाचखोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका आणि एका कंत्राटी लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.
प्राप्त माहितीनुसार, एका विद्यार्थिनीला तिच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची दुय्यम प्रत (डुप्लिकेट एल.सी.) हवी होती. या कामासाठी शाळेतील कंत्राटी लिपिक मोमीन मोहम्मद तलाहा इकबाल (३३) यांनी १,००० रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका तबस्सुम नियाज अहमद मोमीन (५२) यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनीही १,००० रुपये द्यावे लागतील असे सांगितले.
या प्रकरणी तक्रारदाराने २८ ऑगस्ट रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने पडताळणी केली आणि सापळा रचला. २ सप्टेंबर रोजी झालेल्या वाटाघाटीत मुख्याध्यापिकांनी लाचेची रक्कम ८०० रुपयांपर्यंत कमी केली.
३ सप्टेंबर रोजी दुपारी २:०८ वाजता एसीबीच्या ठाणे युनिटने शाळेत छापा टाकला. यावेळी लिपिक इकबाल यांना ८०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्याचबरोबर मुख्याध्यापिका तबस्सुम यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
एसीबीचे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीचे पोलीस निरीक्षक राजश्री शिंदे यांनी सांगितले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, भ्रष्टाचारासंबंधी कोणतीही माहिती किंवा लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल तक्रार असल्यास त्यांच्याशी संपर्क साधावा. संपर्कासाठी ०२२-२०८१३५९८ या क्रमांकावर फोन करू शकता किंवा ९९३०९९७७०० या व्हाट्सअॅप क्रमांकावर संदेश पाठवू शकता.
Reviewed by ANN news network
on
९/०७/२०२४ ०८:४५:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: