बीड : बीड शहरातील वीज विभागात कार्यरत असलेल्या एका कनिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या मदतनीसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) १६,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली.
पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये श्रीमती पूनम लहू आमटे (वय २४) या विद्युत सहायक वर्ग-४ पदावर कार्यरत असून, त्या बीड शहर शाखा-५, ३३/११ के.व्ही. उपकेंद्र, धानोरा रोड, अंकुश नगर, बीड येथे कार्यरत आहेत. दुसरा आरोपी श्री. माने हा त्यांचा मदतनीस आहे.
वीजचोरीचा खोटा आरोप
प्राप्त माहितीनुसार, १७ ऑगस्ट रोजी एका नागरिकाने त्यांच्या घराचा वीज पुरवठा खंडित झाल्याबद्दल ३३/११ के.व्ही. कार्यालयात तोंडी तक्रार नोंदवली होती. त्याच दिवशी आरोपी श्रीमती आमटे व श्री. माने यांनी तक्रारदाराच्या घरी भेट देऊन मीटरची तपासणी केली. या वेळी त्यांनी वीज चोरीचा आरोप करून मीटर काढून घेतले आणि प्रकरण दाखल न करण्यासाठी २०,००० रुपयांची लाच मागितली.
एसीबीकडे तक्रार
लाच देण्यास नकार दिल्यानंतर पीडित नागरिकाने ५ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड येथे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे एसीबीने सापळा रचला आणि ६ सप्टेंबर रोजी आरोपींना १६,००० रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद अघाव आणि पोलीस उप-अधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. निरीक्षक किरण बगाटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. एसीबीच्या पथकात पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरिकांना आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, भ्रष्टाचारासंबंधी कोणतीही माहिती किंवा लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल तक्रार असल्यास त्यांच्याशी संपर्क साधावा. यासाठी टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधता येईल. तसेच ०२४४२-२२२६४९ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा ९९३०९९७७०० या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधता येईल. ई-मेल द्वारे dyspacbbeed@mahapolice.gov.in किंवा dyspacbbeed@gmail.com वर तक्रार नोंदवता येईल. अधिक माहितीसाठी acbmaharashtra.net या संकेतस्थळाला भेट देता येईल.
या घटनेमुळे वीज विभागातील भ्रष्टाचाराच्या समस्येकडे लक्ष वेधले गेले असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या गैरप्रकारांबद्दल तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना कळवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Reviewed by ANN news network
on
९/०७/२०२४ ०८:५०:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: