पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडला
ढाका : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी राजीनामा देत देश सोडला असून लष्करप्रमुखांनी अंतरिम सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
आरक्षणाच्या निषेधार्थ बांगलादेशात सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये देशभरात झालेल्या चकमकींमध्ये सुमारे १०० लोक मारले गेल्यानंतर हसीना यांना लष्करप्रमुखांनी ४५ मिनिटांचा अल्टिमेटम दिला. त्यानंतर हसीना यांनी सोमवारी दुपारी राजीनामा देत पंतप्रधान निवासातून हेलिकॉप्टरने अज्ञातस्थळी जाण्यासाठी देश सोडला. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या धाकट्या भगिनी शेख रेहाना होत्या असे वृत्त ढाका ट्रीब्यूनने दिले आहे. हसीना यांनी आपला राजीनामा लष्करप्रमुखांकडे दिल्याचे वृत्त सोमोय टीव्हीने दिले आहे. त्यांनी भारतात आश्रय घेतला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
76 वर्षीय हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशाच्या लष्करप्रमुखांनी अंतरिम सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
संसदीय निवडणुकीत सत्ताधारी बांगलादेश अवामी लीग (एएल) पक्षाने घवघवीत विजय मिळवल्यानंतर हसीना यांनी या वर्षी जानेवारीमध्ये देशाच्या पंतप्रधान म्हणून सलग चौथ्या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी पदभार स्वीकारला होता.
Reviewed by ANN news network
on
८/०५/२०२४ ०४:३५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: