पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोटारसायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यात महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने यश मिळवले आहे. १ लाख रुपये किंमतीच्या तीन मोटारसायकल जप्त करून एकूण ३ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.
मोसिम अय्याज शेख, वय २७ वर्षे, आणि आरीफ अफजल शेख, वय २८ वर्षे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही खाजगी नोकरी करत असून,ते सध्या खंडोबा माळ, चाकण ता. खेड जि. पुणे येथे राहतात. त्यांचे मूळगाव बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात असलेले दाताळा हे आहे.
१५ जुलै २०२४ रोजी महाळुंगे इंगळे, ता. खेड, जि. पुणे येथील वोक्सवॅगन कंपनी गेट नं. २ समोर मोटारसायकल चोरीची घटना घडली. या घटनेची तक्रार मिळताच महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हेगारांचा शोध सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन इसम मोटारसायकल नं. एम एच १४ डी वाय ०३०२ हिचा हँडल लॉक तोडून चोरताना दिसले. तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरांचा शोध घेतला. त्यापैकी एक, मोसिम अय्याज शेख, वय २७ वर्षे, वोक्सवॅगन कंपनीत दोन दिवस काम करून नंतर काम सोडून गेलेला होता.
तपास पथकाने त्याला चाकण येथून ताब्यात घेतले. त्यावेळी त्याचा साथीदार आरिफ याच्या मदतीने मोटारसायकल चोरल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यांना ताब्यात घेतल्यावर आणखी दोन मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात त्यांचा सहभाग असल्याचे उघडकीस आले.त्यांच्याकडून एकूण १ लाख रुपये किंमतीच्या तीन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
पिंपरी चिंचवड परिसरात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्ह्यांचे क्राईम मॅपिंग करून, नाकाबंदी, पेट्रोलिंग आणि घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने कार्यवाही केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने जलद आणि प्रभावी कार्यवाही करून मोटारसायकल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले. या यशस्वी तपासामुळे परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास वाढला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: