सांगली : सांगली जिल्ह्यातील येडेमच्छिंद्र येथील तलाठी सिमा विलास मंडले (वय ४४) आणि एक खासगी व्यक्ती चंद्रकांत बबनराव सुर्यवंशी (वय ३२) यांनी लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात तक्रार दिलेल्या व्यक्तीने नुकतीच शेतजमीन खरेदी केली होती. त्या जमिनीच्या सातबारावरून जुन्या मालकाचे नाव कमी करून तक्रारदाराचे नाव दाखल करण्यासाठी सिमा मंडले आणि चंद्रकांत सुर्यवंशी यांनी १० हजार रुपये लाच मागितली. यासंदर्भात १ ऑगस्ट रोजी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
या तक्रारीची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली असता सूर्यवंशी यांनी तलाठी मंडले यांच्याशी व्हाटसअॅपवर विचारविनिमय करून तलाठी, मंडल अधिकारी यांच्यासाठी १० हजार रुपये लाच मागितली. तडजोडीअंती ७ हजार स्वीकारण्याचे ठरविले असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांना दिसून आले. त्यामुळे दोन्ही आरोपींविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: