मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गट १०० जागा लढविणार असल्याचा दावा शिवसेना आमदार आणि राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुतीने आपल्या भूमिकेत बदल करत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणूक आचारसंहिता येत्या दीड महिन्यांत लागू होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे महायुतीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून विविध दावे-प्रतिदावे सुरू आहेत.
दिपक केसरकर यांनी याबाबत अधिक माहिती देताना स्पष्ट केले की, “आम्ही १०० जागा लढवण्याचा निर्धार केला आहे. भाजपसुद्धा आपला प्रभाव असलेल्या क्षेत्रात विचार करत आहे. आम्ही ९०-९५ जागा लढवाव्या असे भाजपला वाट आहे. तर अजित पवार गटाने सुमारे ६० जागा लढवाव्यात असे त्यांचे मत आहे. परंतु, मुख्यमंत्री शिंदे यांची १०० जागांची मागणी आहे. त्यांची वरिष्ठांसोबत चर्चा झाल्यानंतर या आकड्यात काही बदल होऊ शकतात. तरीसुद्धा, तयारी १०० जागांवरच केली जात आहे, आणि भाजपही त्यांच्या निश्चित जागांवरच लक्ष केंद्रित करत आहे. यामुळे महायुतीमध्ये एकता आहे आणि आमची तयारी पूर्ण आहे.”
आज पुण्यात भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला भाजपचे राज्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत भाजप किती जागा लढवणार याचा निर्णय होऊ शकतो. भाजप १५०-१६० जागा लढवण्याची घोषणा करू शकते. तसे झाले तर, गामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे धोरण नेमके काय असेल ते स्पष्ट होऊ शकेल.
महायुतीच्या सर्व घटकपक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गट यांची निवडणूक रणनीतीवर चर्चा चालू आहे. शिंदे गटाच्या १०० जागांच्या मागणीने नवा मुद्दा पुढे आला आहे.
केसरकर यांनी केलेला दावा आणि भाजपची होणारी बैठक, या दोन घटनांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या राजकीय स्थितीला महत्त्वाचे वळण मिळण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: