पुणे : अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे समर्थक त्यांना मुख्यमंत्री होण्याच्या शुभेच्छा देत आहेत. सांगवी येथील समर्थकांनी या शुभेच्छांसाठी एक विशेष केक तयार केला, ज्यावर "मी अजित आशा अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो की..." असा उल्लेख होता. अजितदादांनी स्वतः हा केक कापत या शुभेच्छांचा स्वीकार केला.
राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी असतो. या निमित्ताने त्यांना एक दिवस आधीच शुभेच्छा मिळताना दिसल्या. अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून जोरदारपणे केली जात आहे. सांगवी येथील आदिराज शितोळे आणि त्यांच्या समर्थकांनी हा विशेष केक तयार करून अजित पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.
अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केक कापण्याच्या कार्यक्रमात त्यांनी सहभागी होत या शुभेच्छांचा स्वीकार केला. या केकवरील मुख्यमंत्रीपदाचा उल्लेख पाहून राजकीय वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. कार्यकर्ते आणि समर्थकांनी त्यांना आगामी काळात मुख्यमंत्री पद मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: