पिंपरी : मागील काही वर्षात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचा दर्जा ढासळू लागला असल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. त्यातच वादग्रस्त पूजा खेडकर प्रकरणात रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिल्या अपंगत्व दाखल्यामुळे येथील अनागोंदी कारभार प्रकाशात आला आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे हे कारभार सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी तो कसा चांगला आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आता आणखी एक नवे प्रकरण समोर आले आहे. एक नवजात बालक जीवंत असताना ते मृत असल्याचे दाखवून त्याचा स्मशान दाखला तयार करण्याचा प्रताप या रुग्णालयातील डॉक्टरांनी केला असल्याचे पुढे आले आहे.
२३ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता हा धक्कादायक प्रकार घडला. रुग्णालयात एका महिलेनं नवजात बाळाला जन्म दिला. डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित करून तात्काळ स्मशान दाखला तयार केला. मात्र, बाळ जिवंत असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याचे कागदपत्रांत नमूद आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान पुण्यात आढळलेल्या अर्भकविक्री प्रकरणाप्रमाणेच या घटनेमागे देखील अर्भक मृत दाखवून विक्री करणारे रॅकेट तर नाही ना? अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी प्रत्येक प्रकरणात केवळ वरवरची चौकशी न करता संबंधित डॉक्टरला निलंबित करून या प्रकरणाची चौकशी करावी आणि आजवर रुग्णालय सांभाळण्यात अपयशी ठरलेल्या अधिष्ठाता डॉ. वाबळे यांना सक्तीची निवृत्ती द्यावी अशी मागणी नागरिकात जोर धरू लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: