पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागांत पाणी साचले असून, यासंदर्भात महापालिकेने आपत्कालीन यंत्रणा युद्धपातळीवर कार्यान्वित केली आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून धोकादायक स्थळांवरील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यांच्यासाठी भोजन आणि आवश्यक सुविधांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
शहरातील सखल भागांत पाणी साचल्यामुळे पाणी उपसा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. महापालिकेच्या मुख्यालयासह सर्व क्षेत्रीय कार्यालयांत आपत्कालीन नियंत्रण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. अग्निशमन दलासह विविध विभागांशी समन्वय साधून आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन केले जात आहे.
पवना धरणातून पाणी सोडण्यात येत असले तरी नदीकाठच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियंत्रण कक्षाने आपत्कालीन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून, मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यांना वेळोवेळी परिस्थितीची माहिती दिली जात आहे.
शहरातील काही भागांत पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत, जसे की भोसरी येथील पांजरपोळ समोरील पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. मदर तेरेसा होम परिसर, लांडगेनगर, चिखली घरकुल, अभिनवनगर जुनी सांगवी येथील झोपड्यांमध्ये पाणी शिरले आहे. पुनावळे रस्ता, मोरवाडी लालटोपीनगर परिसर, औंध रावेत बीआरटी मार्ग यांसारख्या ठिकाणीही पाणी साचले आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी अतिरिक्त आयुक्तांवर क्षेत्रीय कार्यालयांशी समन्वय ठेवण्याची जबाबदारी सोपवली आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असून नागरिकांना आवश्यकतेशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: