पुणे : मावळ आणि मुळशी तालुक्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी 25 जुलै सकाळी आठ वाजल्यापासून 29 जुलै सकाळी आठ वाजेपर्यंत सर्व पर्यटन स्थळांवर जाण्यास मनाई केली आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील धरणांमध्ये पाण्याची पातळी वाढल्याने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, आणि नद्या-ओढ्यांचे प्रवाह वेगवान झाले आहेत. यामुळे धबधब्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून, डोंगराळ भागात भूउत्खलन होण्याची शक्यता आहे.
अशा स्थितीत मावळ आणि मुळशी तालुक्यातील पर्यटन स्थळे, धरणे, नदीपात्रे आणि त्यांच्या परिसरात जिवीत आणि वित्तहानीची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या ठिकाणी जाण्यासाठी पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून, वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या स्थळांवरही गार्डची नियुक्ती करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: