.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाचा वापर करत मुंबईत एका ठकसेनाने चक्क एका पोलिसालाच तब्बल ९३ लाख रुपयांना गंडविल्याची घटना घडली आहे.
विजय गायकवाड, वय ५७ असे फसवणूक झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे त्याने सहार पोलीसठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अपूर्व जगदीश मेहता वय ४८ या व्यावसायिकावर विश्वासघात आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
मेहता यांनी गायकवाड यांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भेटून त्यांच्याशी ओळख वाढवली.
२०२१ मध्ये मेहता यांनी गायकवाड यांना सांगितले की शरद पवारांच्या आदेशाने तो एक नवीन व्यवसाय सुरू करणार आहे. त्यांनी दोन कंपन्या स्थापन करण्याची योजना आखली आणि गायकवाड यांना सांगितले की त्यांची मुलगी आणि मुलगा या कंपन्यांचे भागीदार होतील. त्यांनी गायकवाड यांच्याकडून एक कोटी रुपये मागितले.
गायकवाड यांनी आपला फ्लॅट विकला, एल आय सी कडून कर्ज घेतले आणि भविष्य निर्वाह निधी काढून ९३ लाख रुपये मेहता यांना दिले. व्यवसायाच्या प्रगतीबद्दल विचारल्यावर, मेहता यांनी गायकवाड यांना त्यांच्या मुलीच्या कुंडलीतील 'राहू दोष' काढण्यासाठी दक्षिणेश्वर काली मंदिरात पूजा करण्याचा सल्ला दिला.
मेहता यांनी गायकवाड यांना दिंडोशी कोर्टात नेऊन काही कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतली, पण अखेरीस गायकवाड यांनी जाणले की मेहता यांनी त्यांची फसवणूक केली आहे. हे समजल्यावर, गायकवाड यांनी सहार पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: