पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील चिखली भागात इंद्रायणी नदीच्या पूररेषेच्या आत बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेल्या २३ बंगल्यांवर त्वरित कारवाई करावी असे आदेश महापालिकेला हरित लवादाने दिले आहेत.
चिखली येथील सर्व्हे नंबर 90 मध्ये “रिव्हर व्हिला” हा एक बंगल्यांचा प्रकल्प नदीच्या निळ्या पूररेषेच्या आत बेकायदेशीरपणे उभारण्यात आला आहे. महापालिकेच्या अधिकार्यांनी हा प्रकल्प उभारला जात असताना सोयिस्कर डोळेझाक केली होती. या प्रकरणी तानाजी गंभीरे यांनी 2020 मध्ये हरित लवादाकडे मुख्य सचिव, महाराष्ट्र सरकार, प्रधान सचिव, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र सरकार, राज्यस्तरीय पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण- महाराष्ट्र (SEIAA) सदस्य सचिव, यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
या गृहप्रकल्पाच्या ठिकाणी इंद्रायणी नदीत भराव टाकण्यात आला. बांधकामाचे सांडपाणी नदीच्या प्रवाहात सोडले जात होते.नदी पात्रालगत रस्ते तयार करण्यात आले. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली गेली. सध्या या ठिकाणी 23 बंगले तयार असून एकूण 99 बंगले बांधण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाच्या उभारणीमध्ये विकसकाने पर्यावरण अधिनियमातील तरतुदी धाब्यावर बसविल्या आहेत.महापालिकेने ही बांधकामे वेळीच पाडली नाहीत. त्यामुळे पालिकेचे अधिकारीही तितकेच जबाबदार आहेत. या प्रकरणात पर्यावरण कायदा-1986, जल (पी आणि सीपी) कायदा-1974 आणि वायू (पी आणि सीपी) अधिनियम 1981 च्या तरतुदींचे उल्लंघन झाले आहे असा निष्कर्ष नोंदवत या प्रकरणी हरित लवादाने कारवाईचे आदेश महापालिकेला दिले आहेत.
Reviewed by ANN news network
on
७/०३/२०२४ ०१:१६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: