सिक्रेट सर्व्हिस एजंटने हल्लेखोराला जागीच ठार केले
पेनसिल्व्हेनिया : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेनसिल्व्हेनिया प्रांतातील बटलर येथे १३ जुलै रोजी सायंकाळी एका जाहीर सभेच्या वेळी गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला. गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली आणि तिने ट्रम्प यांच्या मागे असलेल्या एका व्यक्तीचा वेध घेतला.अन्य दोन जण जखमी झाले.
गोळीबार करणार्या व्यक्तीने सभास्थानानजिक असलेल्या एका उंच जागेवरून गोळीबार केला. त्याला अमेरिकन सिक्रेट सर्विस एजंटने जागीच ठार केले. हल्लेखोराची ओळख मॅथ्यू थॉमस क्रूक्स अशी पटली असून तो २० वर्षांचा होता. त्याने ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न का केला हे अद्याप समजलेले नाही.
या प्रकाराविषयी आताच काही बोलणे अयोग्य ठरेल. या हल्ल्यामागे एकटाच क्रूक्स होता की आणखी काही व्यक्ती या कटात सहभागी आहेत याचा तपास सुरू आहे असे तपास यंत्रणांच्या अधिकार्यांनी म्हटले आहे.
या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी एक निवेदन जारी केले असून त्यात अमेरिकन सिक्रेट सर्व्हिसचे आभार मानले आहेत. तसेच या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
या घटनेच्या वेळी ट्रम्प व्यासपीठावरून बोलत होते. गोळीबाराचा आवाज ऐकू येताच ते खाली वाकले. काहीतरी गंभीर घडत असल्याचे लक्षात येताच सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी त्यांच्याभोवती सुरक्षाकडे केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आणि म्हटले की राजकारण आणि लोकशाहीमध्ये हिंसाचाराला स्थान नाही.
“माझे मित्र माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मी चिंतेत आहे. घटनेचा तीव्र निषेध. राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. त्यांना लवकरात लवकर बरे वाटावे यासाठी शुभेच्छा. मोदींनी मृतांच्या कुटुंबियांबाबत सहवेदना व्यक्त केल्या असून, जखमी झालेल्यासह अमेरिकन जनतेसोबत आपण आहोत,” असे मोदींनी ट्विट केले असून @realDonaldTrump यांना टॅग केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: