पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात केडगाव येथे असलेल्या पंडिता रमाबाई मुक्ती मिशन या जुन्या आणि नामांकित संस्थेमध्ये राहणार्या ४ मुलींचा विनयभंग करणार्या लिंगपिसाट अकाऊंटस मॅनेजरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विनयभंग झालेल्या मुलींपैकी एक अल्पवयीन असल्याने त्याच्यावर पोक्सो कायद्याखालीही कारवाई झाली आहे.
भास्कर निरगट्टी (वय-५३) असे या पिसाट आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीसकोठडी दिली आहे.
पंडिता रमाबाई मुक्ती मिशन ही केडगावमधील जुनी आणि नामांकित ख्रिस्ती मिशन संस्था आहे. ही संस्था अनाथ, अपंग मुलींना आसरा देते. त्यांचे संगोपन, शिक्षण या संस्थेत मोफत केले जाते. आरोपी या संस्थेत अकाऊंट्स मॅनेजर असून त्याने संस्थेतील चार मुलींचा १७ एप्रिल रोजी विनयभंग केला. त्यामुलींपैकी तीन सज्ञान आहेत. तर, एक अल्पवयीन आहे.
हा प्रकार घडल्यानंतर तेथे समुपदेशक मह्णून काम करणार्या महिलेला या मुलींनी माहिती दिली. त्यानंतर त्या महिलेने या प्रकरणी यवत पोलीसठाण्यात तक्रार दिली. १२ जुलै रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
या आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दौंड परिसरातील अनेक सामाजिक संस्थांनी केली आहे.
Reviewed by ANN news network
on
७/१४/२०२४ ०१:५३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: