अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्या! आ. गोरखे यांची तहसीलदारांकडे मागणी
पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे कासारवाडी, पिंपरी गाव, फुगेवाडी, मोरवाडी, लालटोपी नगर, दापोडी इत्यादी भागात पुराचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. पूरग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई देण्यासाठी तातडीने पंचनामे करण्याची मागणी आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी चिंचवड तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे केली आहे.
पुणे जिल्ह्यात गेल्या 3-4 दिवसांपासून सलग अतिवृष्टी सुरू आहे, ज्यामुळे नागरिकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील सखल भागातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने त्यांचे हाल झाले आहेत. काही ठिकाणी घरांच्या भिंती ढासळल्या आहेत. नवनिर्वाचित विधान परिषद आमदार अमित गोरखे यांनी या पूरग्रस्त भागांची पाहणी केली आणि तहसीलदारांना तातडीने पंचनामे करून नागरिकांना मदत देण्याची मागणी केली.
अतिवृष्टीमुळे विद्युत पुरवठा मोठ्या प्रमाणात खंडित झाला असून, विद्युत वाहिन्या उघड्यावर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासन प्रशासनाने नागरिकांना लवकरात लवकर मदत करावी आणि त्यांची अडचण सोडवावी, तसेच नागरिकांनी पुढचे काही दिवस सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: