मुंबई : महाराष्ट्रातील सुमारे 10 टक्के मतदार मतदानापासून वंचित असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांशी दिल्लीत 24 जुलै रोजी झालेल्या बैठकीत ही समस्या मांडली. त्यावेळी मुंबई अध्यक्ष आशीष शेलार आणि माजी खासदार किरिट सोमय्या देखील उपस्थित होते.
बावनकुळे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनात लोकसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यांनी सांगितले की, 2019 साली एका मतदारसंघात असणारी दीड लाख मते 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नव्हती. त्यांनी नागपूर लोकसभा क्षेत्राचे उदाहरण दिले आहे.
बावनकुळे यांनी निवडणूक आयोगाला मतदार याद्या तयार करताना डाटा एन्ट्रीच्या चुका आणि बुथ लेव्हलच्या अधिकाऱ्यांकडून झालेल्या त्रुटीबद्दल माहिती दिली. तसेच त्यांनी विनंती केली की, एका बुथवरील मतदार यादी एक हजार मतदारांची करावी, वयोवृद्ध मतदारांचे वय 85 वरून 75 करण्यात यावे आणि हाऊसिंग सोसायट्यांमध्ये 100 टक्के बुथ लावण्यात यावेत.
मुख्य निवडणूक आयुक्तांनी या त्रुटींकडे लक्ष दिल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
Reviewed by ANN news network
on
७/२६/२०२४ ११:३५:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: