पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरात २४ जुलै रात्रीपासून आणि २५ जुलै दिवसभर अतिवृष्टी झाली आहे. सलग दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे भोसरी विधानसभा परिसरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्याने ड्रेनेजमधील मैलामिश्रीत पाणी सर्वत्र पसरले आहे. यामुळे रोगराई निर्माण होण्याचा धोका वाढला आहे.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन तातडीने औषध व धुरफवारणी करण्यात यावी अशी सूचना केली आहे. गव्हाणे यांनी शुक्रवारी पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रशासक व आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली. यावेळी माजी नगरसेवक पंकज भालेकर, विनायक रणसूभे, धनंजय भालेकर, तानाजी खाडे, रवींद्र आप्पा सोनवणे, संजय बोराडे, प्रसाद कोलते, शरद भालेकर, कल्पेश गोराड, राहुल पवार, पंढरीनाथ गरुड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
भोसरी परिसरात बुधवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि गुरुवारी देखील पावसाचा जोर कायम होता. या पावसामुळे प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींच्या कामकाजाचे अनागोंदी समोर आले आहे. अनेक नागरिक पावसाच्या साचलेल्या पाण्यात अडकले असून, काहींना त्यांच्या घरांतून स्थलांतरित व्हावे लागले आहे.
भोसरी विधानसभेतील सेक्टर २२, रूपीनगर, तळवडे, चिखली, मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, ताम्हाणेवस्ती, घरकुल, कुदळवाडी, जाधववाडी, भोसरी येथील शांतीनगर आणि महात्मा फुले नगर या भागातील ३०० हून अधिक लघुउद्योगांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक दुकानदारांच्या दुकानांमध्ये पाणी साचल्याने लाखो रुपयांच्या मशीनचे नुकसान झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. तसेच दिघी, चहोली, डूडुळगांव, नेहरुनगर, बालाजीनगर, निगडी गावठाण इत्यादी भागात ड्रेनेजमधील मैलामिश्रीत पाणी पसरले आहे. नागरीकांच्या घरांमध्ये पाणी घुसले आहे.
शुक्रवारी पावसाला थोडासा विश्रांती मिळाली असली तरी सांडपाणी आणि मैलामिश्रीत पाणी सर्वत्र पसरल्याने रोगराईच्या प्रसाराची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना म्हणून औषध व धुरफवारणी करण्यात यावी, अशी सूचना अजित गव्हाणे यांनी प्रशासनाला केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: