चिखलीत भंगार व्यापार्‍यांचे जीएसटी बुडवणारे रॅकेट, अधिकार्‍यांची डोळेझाक!; परिवर्तन वाहतूक विकास आघाडीचा आरोप

 


पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरात अनेक भंगार व्यावसायिकांची भलीमोठी गोदामे आहेत.  या व्यापार्‍यांचे जीएसटी बुडविणारे एक रॅकेट कार्यरत असून जीएसटी बुडविण्याच्या प्रकरणात फरार असलेला एक व्यापारी त्याचा सूत्रधार आहे. या रॅकेटला जीएसटी विभागातील अधिकार्‍यांचाही आशीर्वाद आहे असा आरोप पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीचे शहर उपाध्यक्ष गोपाल कचवे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. 

यावेळी पिंपरी चिंचवड परिवर्तन वाहतूक विकास आघाडीचे अमित मोहिते, झोपडपट्टी सेलचे शहर अध्यक्ष सागर जाधव, सामुहिक गुंडगिरी, दहशतवाद तंटा भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे  विशाल मिठे आदि उपस्थित होते.

या प्रकरणाची माहिती देताना कचवे म्हणाले, चिखली, कुदळवाडी येथील काही भंगार व्यवसाय करणारे व्यापारी मागील काही वर्षापासून जीएसटी अकाउंटच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून, बनावट नावाने, त्रयस्थ व्यक्तींच्या नावे जीएसटीचे खाते उघडून हजारो कोटी रुपयांची करचोरी करीत असल्याचे माहिती कायद्याद्वारे मागवलेल्या माहितीतून सिद्ध झाले आहे. करचोरी करणारे मोठे रॅकेट सक्रीय असून त्यांच्या माध्यमातून देशाच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे काम राजेरोसपणे सुरू आहे. यातून अनेक उद्योजकांची फसवणूक केली जात आहे. ही बाब पुण्यातील जीएसटी विभागाचे अतिरिक्त महासंचालक देवेंद्र नागवेकर यांच्या निदर्शनास आणून देखील त्यांनी याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे असाही आरोप गोपाल कचवे यांनी केला.

...अन्यथा, २१ जुलैपासून आंदोलन!

 पुण्यातील जीएसटी विभागातील काही अधिकारी या रॅकेटमध्ये सहभागी असल्याने या रॅकेटमध्ये सहभागी असल्यामुळे यात नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना न्याय मिळत नाही अशा पद्धतीने राज्यातील ज्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असेल त्यांनी पिंपरी चिंचवड परिवर्तन वाहतूक विकास आघाडीशी संपर्क साधावा लवकरच याबाबत न्यायालयात दावा दाखल करण्यात येणार आहे. तसेच करचुकवेगिरी करणाऱ्या संबंधित व्यापाऱ्यांवर अधिकाऱ्यांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा २१ जुलै पासून पुण्यातील जीएसटी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा पिंपरी चिंचवड परिवर्तन वाहतूक विकास आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.

बोगस कंपन्या स्थापून करचोरी?

कचवे पुढे म्हणाले की, अनेकांच्या नावे बोगस कागदपत्रांच्या आधारे परस्पर अनेक बनावट कंपन्या चालू करुन बिल विक्री करणे, हवालामार्फत पैसे देवाण घेवाण करणे, नवनवीन बॅंकखाती वापरणे, मनी ट्रान्सफर मार्फत हवाला आणणे या माध्यमातून जीएसटीची चोरी केली जाते. यासाठी स्क्रॅप, प्लॅस्टिक,स्टील, रिअल इस्टेट मधील व्यावसायिकांना बनावट कंपनीची जीएसटीची बिले दिली जातात. अस्तित्वात नसलेल्या कंपन्याच्या बनावट देयकांच्या मदतीने खरेदीविक्रीचे खोटे व्यवहार कागदोपत्री दाखवून त्याचे आपआपसात चक्रीय पध्दतीचे व्यवहार दाखवतात आणि त्या आधारे जीएसटी इनपुट क्रेडिट मिळवून वर्षाला हजारो कोटींची करचोरी केली जाते. नंतर अधिकारीवर्गाच्या मदतीने उभ्या केलेल्या बनावट कंपन्या बंद करुन या प्रकरणातून रॅकेटमधील व्यापारी सहीसलामत सुटतात.


कुख्यात व्यक्तीसह अनेकांचा रॅकेटमध्ये सहभाग?

   अनेक वर्षापासून कुदळवाडी परिसरात एका व्यक्तीकडून जीएसटीचोरीचे रॅकेट चालवले जात असल्याचा आरोप गोपल कछवे यांनी केला आहे. 
तो एका कंपनीचा मालक असून शेकडो कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यातील प्रमुख फरार आरोपी आहे असाही आरोप कछवे यांनी केला आहे.हा रॅकेटचा प्रमुख आणि त्याचे परप्रांतीय साथीदार गरीब लोक, मित्र, नातेवाईक यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या नावावर अनेक कंपन्या चालवतात. या कंपन्यामार्फत ही सर्व टॅक्सचोरी केली जाते. यामध्ये संबंधित विभागातील काही अधिकारी देखील सामील असल्यामुळे यावर कोणत्याच प्रकारची कायदेशीर कारवाई होत नाही. त्यामुळे, अनेक व्यापारी यांचे ग्राहक बनत आहेत. सरकारचा कोट्यावधी रुपयाचा कर बुडविला जात आहे.रॅकेटप्रमुख फरार आरोपीसह त्याचे काही नातेवाईक आणि परप्रांतीय व्यापार्‍यांचा यात समावेश असल्याचा आरोप कछवे यांनी केला आहे. 
  
जीएसटी विभागातील काही अधिकाऱ्यांचा या रॅकेटवर मेहेरनजर असल्याचा संशय व्यक्त करीत कुदळवाडी मधील अनेक व्यापाऱ्यांच्या आर्थिक व्यवहाराची कसून चौकशी केल्यास अनेक प्रकरणे बाहेर येतील असेही कछवे यांनी म्हटले आहे.




चिखलीत भंगार व्यापार्‍यांचे जीएसटी बुडवणारे रॅकेट, अधिकार्‍यांची डोळेझाक!; परिवर्तन वाहतूक विकास आघाडीचा आरोप चिखलीत भंगार व्यापार्‍यांचे जीएसटी बुडवणारे रॅकेट, अधिकार्‍यांची डोळेझाक!; परिवर्तन वाहतूक विकास आघाडीचा आरोप Reviewed by ANN news network on ६/१९/२०२४ ०१:३९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".