नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्याला सुमारे पाच तास उलटले आहेत. या काळात दिसणार्या आकडेवारीवरून भारतीय जनता पक्ष २३२ जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र दिसत असून काँग्रेसने ९९ जागांवर आघाडी घेतली आहे. उत्तरभारतात भाजपची कामगिरी बरी असली तरी महाराष्ट्र् आणि पश्चिम बंगालमध्ये मात्र या पक्षाची कामगिरी घसरल्याचे दिसते.
विजयी पक्ष किंवा युतीला केंद्रात सत्तेत येण्यासाठी लोकसभेच्या ५४३ जागांपैकी किमान २७२ जागा आवश्यक आहेत.गुजरातमधील सुरतची जागा यापूर्वीच भाजपने बिनविरोध जिंकली आहे.
भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने आणखी एका महत्त्वपूर्ण राज्य बिहारमध्ये नेत्रदीपकपणे चांगली कामगिरी केली आहे, जिथे त्यांचे उमेदवार ३८ पैकी ३१ जागांवर आघाडीवर आहेत. इंडी आघाडीचे सदस्य राजद, मार्क्सवादी कम्युनिस्ट आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया अनुक्रमे चार, दोन आणि एका जागेवर त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पुढे आहेत.
आंध्र प्रदेशात २५ लोकसभा जागांपैकी २१ जागांवर एनडीएचे उमेदवार पुढे होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये ५७ हजार मतांची आघाडी घेतली आहे, मात्र, भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या अमेठीमध्ये काँग्रेसच्या किशोरीलाल यांच्या विरोधात सुमारे ३२ हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
दुसरीकडे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी रायबरेलीमध्ये जवळपास एक लाख मतांनी आघाडीवर आहेत.
हरियाणामध्येही काँग्रेसने चांगली कामगिरी केली, तेथे काँग्रेसच्या पाच उमेदवारांनी आघाडी घेतली, तर भाजपने चार मतदारसंघात आघाडी कायम ठेवली.
सुरुवातीच्या निकराच्या लढाईनंतर, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी नावाच्या इंडी आघाडीतील गटाने भाजपला धोबीपछाड दिल्याचे दिसते. हे वार्तापत्र लिहीत असताना करताना, महाविकास आघाडी ३० जागांवर आणि महायुती १७ जागांवर पुढे होती. काँग्रेस आणि उबाठा शिवसेना उमेदवार प्रत्येकी ११ जागांवर त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पुढे होते, तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरद पवार गट आठ जागांवर आघाडीवर होता.
बारामती येथे पवार घराण्याच्या प्रतिष्ठेच्या लढतीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे त्यांचे पुतणे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या पुढे होत्या. अजित पवार यांनी आपल्या काकांच्या विरोधात ११ महिन्यांपूर्वी बंडखोरी केली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षात फूट पडली होती. ते एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील झाले होते.
.प्राप्त माहितीनुसार, भाजपचे उमेदवार 11 मध्ये आघाडीवर होते, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार पाचवर पुढे होते, तर अजित पवारांची राष्ट्रवादी केवळ एका जागेवर पुढे होती.
सांगलीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील पुढे होते.
तथापि, मध्यप्रदेशातून भाजपसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे दिसते, तिथे सर्व 29 मतदारसंघांमध्ये एनडीए आघाडीवर आहे. मोदींचे राज्य असलेल्या गुजरातमध्येही राज्यातील २६ पैकी २४ मतदारसंघांत भाजपचे उमेदवार आघाडीवर होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जे सरकार आणि भाजपमधील दुसरे सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानले जातात, त्यांनी ३ लाख ८६ हजार मतांनी आघाडीवर होते.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल ३१ मतदारसंघात आघाडी घेऊन भाजपपेक्षा पुढे आहे, तर भाजप दहा आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे.
तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस आणि पक्षाच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी डायमंड हार्बर मतदारसंघात मोठी आघाडी मिळवली आहे, तर पक्षाचे उमेदवार पार्थ भौमिकल बॅरकपूरमध्ये भाजपचे विद्यमान खासदार अर्जुन सिंह यांच्या विरोधात किरकोळ आघाडीवर आहेत.
कलकत्ता उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आणि भाजपचे उमेदवार अभिजत गांगुली तमलूकमध्ये 5 हजारपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर होते.
तथापि, बहरामपूरमध्ये एक रोमांचक तिरंगी लढत सुरू होती, जिथे लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आता तृणमूलचे उमेदवार माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांच्या मागे दुसऱ्या क्रमांकावर होते. काही काळापूर्वी चौधरी तिसऱ्या क्रमांकावर होते, भाजपचे निर्मल कुमार साहा आघाडीवर होते. साहा सध्या तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: