पावसाळ्यापूर्वी महामार्गाच्या बाजूला असणारे मातीचे ढिगारे हटवावेत : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह



रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी चौपदरीकरण रस्त्याच्या कामाबरोबरच दुरुस्ती, साईड पट्टी, कचरा, रस्त्याच्या कडेला असणारा मातीचा ढिगारा, वाहतुकीला होणाऱ्या अडचणीबाबत आज पहाणी केली. पावसाळ्यापूर्वी महामार्गाच्या बाजूला असणारे ढिगारे हटविण्याबरोबरच नगरपालिकेने शहरातील रस्त्यांच्या दुरुस्ती, साईड पट्टींचे काम करावे. महामार्गाचे कामही गतीने करण्याची सूचना जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी संबंधितांना दिली.

   पालकमंत्री श्री. सामंत यांनी आज सकाळी दूरदृश्यप्रणालीद्वारे सर्व विभागांची मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली. त्यांच्याच सूचनेनुसार जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी  तात्काळ पहाणी केली. मारुती मंदिर येथील चौकात वाहतूक सुरळीत होण्यासाठी पार्कींग, स्टॉपिंग पट्टी करण्याबरोबरच या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला डांबरीकरणाचा थर करण्याची सूचना दिली. साळवी स्टॉप येथे चौपदरीकरणाची पाहणी करुन हे काम गतीने करण्याची सूचना दिली. पाऊस पडल्यानंतर बाजूला असणारे मातीचे ढिगारे वाहून चिखल होणार नाही, याची दक्षता घेऊन ते बाजूला करावेत, असेही जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले. कुवारबाव आणि हातखंबा येथेही रस्त्याच्या कामाची पहाणी करुन दिशादर्शक फलक, रम्बलर लावण्याची सूचना केली.

   हातखंबा-पाली रस्त्यावरील कामाची पहाणी करुन जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, रस्त्यावर पडलेले खड्डे भरुन घ्यावेत. रस्त्याची दुरुस्ती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कंत्राटदारांनी 1 जून पूर्वी ही कामे पूर्ण करावीत. ख्वाजा जमेरीनगर भागातील रस्त्याच्या बाजूला पडलेल्या कचरा निर्मुलनाचे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करावे. 

     पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी म्हणाले, पोलीस यंत्रणांच्या माध्यमातून रबर बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर पूर्व सूचना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाचे अथवा भरतीचे अर्लट असताना नागरिकांनी सतर्क राहून आपली आणि इतरांची काळजी घ्यावी. तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.

   मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार म्हणाले, मान्सूनच्या अनुषंगाने सर्व गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी अशी सूचना देण्यात आली आहे की, विद्यार्थी, लहान मुलांची काळजी म्हणून धोकादायक साकव बंद करण्याची सूचना देण्यात आली आहे. आरोग्य विभागालाही सतर्कच्या सूचना देण्यात आल्या आहे. 

   यावेळी प्रांताधिकारी जीवन देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत राहूल देसाई, तहसिलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी तुषार बाबर उपस्थित होते.

पावसाळ्यापूर्वी महामार्गाच्या बाजूला असणारे मातीचे ढिगारे हटवावेत : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह पावसाळ्यापूर्वी महामार्गाच्या बाजूला असणारे मातीचे ढिगारे हटवावेत : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह Reviewed by ANN news network on ५/२३/२०२४ १०:२२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".