डोंबिवलीत एकच खळबळ
डोंबिवली : डोंबिवली पूर्व या भागात मानपाडा रोडवर असलेल्या एका रुग्णालयातील तीन डॉक्टरांना एका महिलारुग्णाचा नातेवाईक चावला. या प्रकारामुळे तीनही डॉक्टर जखमी झाले असून या प्रकरणी शनिवारी मानपाडा पोलीसठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महिलारुग्ण ज्योती सिंंग, तिचा पती राज सिंंग, राज याची सासू शशिकला सिंग अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी राज सिंग आपली पत्नी ज्योती हिला तिच्या पोटात दुखत असल्याने आरोग्यम रुग्णालयात घेऊन आला. त्यावेळी तेथे ड्युटीवर असलेल्या डाॅ. नितीन खोटे यांनी तिला रुग्णालयात दाखल करून इंजेक्शन दिले.थोड्यावे़ळाने ज्योतीला बरे वाटू लागल्याने घरी जाण्याचा सल्ला दिला.
त्या प्रमाणे राज सिंग, ज्योती आणि तिची आई शशिकला सिंग हे घरी निघाले. मात्र, रस्त्यातच पुन्हा ज्योतीच्या पोटात दुखू लागल्याने हे तिघेही पुन्हा रुग्णालयात परतले. डॉक्टरांनी पुन्हा तिला इंजेक्शन दिले. यावेळी राज सिंग याने डॉक्टरांना अडविले आणि रागाने माझ्या पत्नीला काय झाले आहे. तुम्ही आतापर्यंत काय उपचार केले आहेत, तुमची वैद्यकीय पदवी काय आहे असे प्रश्न विचारत आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी पोटाचा सीटी स्कॅन करावा लागेल त्यानंतर निश्चित निदान करता येईल असे त्यांना सांगितले. त्यावेळी अधिक संतापून राज सिंग याने आता हे काही करायची गरज नाही. तुम्ही काहीही सांगू नका. मी तुम्हाला बघतो, असे म्हणत डाॅ. खोटे यांना मारहाण सुरू केली. यामुळे डाॅ. खोटे जमिनीवर पडले. त्यांना राज यांच्यापासून वाचविण्यासाठी डाॅ. संदीप यादव, इम्तियाझ मुल्ला पुढे आले. त्यावेळी राज सिंग याने या तिघांनाही जोराने चावे घेतले. तर त्याची सासू शशिकला हिने रुग्णालयातील कर्मचारी उषा दुर्गेश यांना शिवीगाळ केली.
या प्रकरणी जखमी डॉक्टरांची पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीचा अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकारामुळे डोंबिवलीतील वैद्यक व्यावसायिकांच्या संघटनांनी या घटनेचा निषेध करत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: