२३ पाकिस्तानी खलाशांनाही सोडविले!
मुंबई : हिंदी महासागरात मासेमारी करणार्या इराणच्या जहाजाचे अपहरण सोमालियन सागरी चाच्यांनी केले होते. भारतीय नौदलाने चाच्यांच्या तावडीतून या जहाजाची सुटका करून ९ सोमालियन चाच्यांना जेरबंद करून मुंबईतील यलोगेट पोलीसठाण्याच्या ताब्यात दिले आहे. अपहरण झालेल्या इराणी जहाजवर २३ पाकिस्तानी कर्मचारी होते.
हिंदी महासागरात आखाती देशांनजिक सोमालियाचे समुद्रीचाचे अनेकदा व्यापारी आणि मासेमारी करणार्या जहाजांचे अपहरण करून त्यातील खलाशांना ओलीस ठेवत जहाजमालक कंपनीकडून मोठी खंडणी वसूल करतात. त्यामुळे जागतिक व्यापारावर त्याचा परिणाम होत आहे. एका जागतिक करारानुसार भारताने या भागात व्यापारी जहाजांचे संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. भारतीय नौदलाची जहाजे या परिसरात कायम गस्त घालत असतात.
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भारतीय नौदलाची आयएनएस त्रिशूल आणि नेव्हल शिप सुभेदा या भागात गस्त घालत होती. २८ मार्च रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास इराणच्या 'ए आय कम्बर' या मासेमारी जहाजाचे अपहरण सोमालियन चाच्यांनी केल्याचा संदेश नौदलाच्या जहाजांना मिळाला.२९ मार्च रोजी पहाटे ३ वाजून १० मिनिटांनी भारतीय नौदलाच्या जहाजांनी अपहृत जहाचा ठावठिकाणा शोधून काढला. हे जहाज सोमालियाच्या हद्दीत १०५ सागरी मैलावर होते. भारतीय नौदलाच्या नौका तेथे पोहोचल्या. त्यांनी चाच्यांना जहाज थांबवून ओलिसांना मुक्त करण्याचा इशारा दिला. मात्र, चाचे त्याकडे दुर्लक्ष करत होते. अखेरीस आयएनएस सुमेधा या जहाजाने अपहृत जहाजा जवळ जाऊन निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर ओलीस ठेवलेल्या जहाजावरील कर्मचार्यांना डेकवर आणून चाच्यांनी आपली शस्त्रे पाण्यात टाकून देत शरणागती पत्करली.
भारतीय नौदलाचे कमांडो अपहृत जहाजावर गेले. त्यांनी चाच्यांना कैद केले. जहाजावरील खलाशांची चौकशी आणि खातरजमा केली. त्यावेळी जहाजावरील २३ कर्मचारी पाकिस्तानी असल्याचे दिसून आले. या कर्मचार्यांनी चाच्यांकडे एके ४७ रायफली,हॅण्डग्रेनेड आणि रॉकेट लाँचर होता अशी माहिती कमांडोंना दिली. पूर्ण चौकशी केल्यावर नौदलाच्या अधिकार्यांनी अपहृत जहाज आणि खलाशी यांना सोडून दिले. सोमलियन चाच्यांना अटक करून त्यांना ३० मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता मुंबईतील यलोगेट पोलीसठाण्यात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.यावेळी नौदलाने अपहृत जहाजावरून जप्त केलेली एके ४७ रायफलची ९२७ जीवंत काडतुसे, ९ मोबाईल फोन्स आणि एक जीपीस डिव्हाईस जप्त करण्यात आले. आय. एन. एस. त्रिशुल या युध्दनौकेचे रेग्युलेटिंग ऑफिसर लेफ्टनंट अंकितकुमार अवाल यांनी या प्रकरणी तक्रार दिली. त्यावरून यलोफेट पोलीसठाण्यात या चाच्यांविरोधात २०/२०२४ क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम३६४ (अ), ३६३, ३५३, ३४१, ३४२, ३४४,(अ) १२०(ब), १४३, १४५, १४७, १४८, १४९, ५०६ (२), ३४ सह मेरिटाईम अन्टी पायरसी अॅक्ट २०२२ कलम ३,५ तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५, २७ आणि पासपोर्ट अधिनियम कलम ३, ६ सह परकीय नागरी कायदा कलम १४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई ही पोलीस सह आयुक्त (का व सु), बृहन्मुंबई, अपर आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, उपआयुक्त, बंदर परिमंडळ, वरिष्ठ निरीक्षक, यलोगेट पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी, पोलीस अधिकारी व तपास पथक यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: