मुंबई गुन्हेशाखा कक्ष ६ ची कामगिरी
मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे तोतयेगिरी करत न्यायालयात आरोपींना जामीन राहण्याचा उद्योग करणार्या एका टोळीला अटक करण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हेशाखा कक्ष ६ मधील कर्मचार्यांना यश आले आहे.
पोलिसांनी ०३ एप्रिल रोजी महात्मा फुले नगर, मानखुर्द, मुंबई येथून या टोळीतील दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून अन्य तिघांना ताब्यात घेण्यात आले.
अमित नारायण गिजे, वय ४४ वर्षे, बंडू वामन कोरडे, ४४ वर्षे राहणार महात्मा फुले नगर, मानखुर्द, अहमद कासिम शेख, ४४ वर्षे, राहणार छेडानगर, मुंबई, संजीव सोहनलाल गुप्ता, ३४ वर्षे, राहणार भिवंडी, जि. ठाणे येथून व उमेश अर्जुन कावले, ४८ वर्षे राहणार कल्याण, जि. ठाणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
त्यांच्याकडून बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड, वेगवेगळया कंपन्यांची ओळखपत्रे, पॅनकार्ड, महानगरपालिकेच्या करपावत्या, एक लॅपटॉप, एक मल्टीपल प्रिंटर, एक मिनी लॅमिनेटर, एकाच इसमाची वेगवेगळया नावांनी तयार केलेली आधारकार्डे, पॅनकार्डे, रेशनकार्डे, बँक स्टेटमेंट, सॉल्व्हन्सी आदी बनावट कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.
एक टोळी बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपींना न्यायालयात जामीन राहण्याच्या उद्योग करून न्यायालयाची फसवणूक करत असल्याची माहिती ०३ एप्रिल रोजी पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे महात्मा फुले नगर, मानखुर्द येथून पोलिसांनी अमित गिजे आणि बंडू कोरडे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तातडीने हालचाल करत अहमद शेख, संजीव गुप्ता, उमेश कावले यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी या प्रकाराची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून वरीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात ३६ / २०२४ (मुंबई गुन्हा क्रमांक. १२५ /२०२४), या क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७३, ४७४, ४७५, ४७६, १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास मुंबई गुन्हे शाखा, कक्ष ६ करीत आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष आयुक्त, देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर आयुक्त (गुन्हे) शशिकुमार मीना, उपायुक्त (प्रकटीकरण -१) विशाल ठाकूर, सहाय्यक आयुक्त (डी - पूर्व), चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष ६ चे प्रभारी निरीक्षक रविंद्र साळुंखे, निरीक्षक पवार, ननावरे, सहायक निरीक्षक गावडे, उपनिरीक्षक मुठे, रहाणे, माशेरे, बेळणेकर, सावंत, सकपाळ, आव्हाड, सहायक फौजदार कुरडे, देसाई, हवालदार पारकर, तुपे, वानखेडे, शिंदे, गायकवाड, मोरे, घेरडे, शिपाई माळवेकर, कोळेकर, अभंग, पवार, सुतार, हवालदार चालक डाळे, आणि शिपाई चालक पाटील यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: