कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज पोलीसठाण्यातील एका महिला पोलीस कॉन्स्टेबलला अॅन्टीकरप्शन खात्याच्या कोल्हापूर येथील पथकाने २ एप्रिल रोजी दोन हजार रुपयांची लाच घेताना 'रंगेहाथ' पकडले.
रेखा भैरू लोहार, वय ३९ वर्षे, रा. हरळी रोड, लक्ष्मीनगर जवळ, मुक्काम पोस्ट भडगांव, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर असे या महिला पोलिसाचे नाव आहे.
या प्रकरणी एका पुरुषाने तक्रार दिली आहे. तक्रारदार आणि त्याच्या पत्नीवर डिसेंबर २०२३ मध्ये मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा गडहिंग्लज पोलीसठाण्यात दाखल आहे. याचा तपास रेखा लोहार यांच्याकडे होता. या गुन्ह्यात तक्रारदार आणि त्याच्या पत्नीविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी लोहार यांनी दोन हजार रुपये लाच मागितली. तक्रारदाराने याची तक्रार कोल्हापूर येथील अॅन्टीकरप्शनच्या कार्यालयाकडे केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर अॅन्टीकरप्शनच्या अधिकार्यांनी सापळा लावला आणि लोहार यांना लाच स्वीकारताना पकडले.
या प्रकरणी गडहिंग्लज पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी, उप अधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आसमा मुल्ला, प्रकाश भंडारे, सहायक फौजदार, हेड कॉन्स्टेबल अजय चव्हाण, सुधीर पाटील, कॉन्स्टेबल पूनम पाटील यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: