पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील महाळुंगे इंगळे येथील आदित्य भांगरे याच्या खून प्रकरणातील सूत्रधाराला गुंडविरोधी पथकाने बेड्या ठोकण्यात यश मिळविले आहे.
महाळुंगे इंगळे येथील आदित्य भांगरे हा १८ वर्षांचा मुलगा १६ मार्च पासून बेपत्ता होता. त्याच्या आईने याबाबत महाळुंगे इंगळे पोलीसठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस करत होते.
दरम्यान १८ मार्च रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास तीन तरुणांनी रासे ता. खेड, जि. पुणे येथे शिक्रापूररोडवर असलेल्या मराठा हॉटेलचे मालक स्वप्नील ऊर्फ सोप्या संजय शिंदे यांच्यावर हॉटेलमध्ये घुसून गावठी पिस्तुलातून गोळीबार करुन त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला होता.
या प्रकरणी चाकण पोलीसठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यासंदर्भात अटक केलेल्या आरोपींपैकी अमर शिंदे याची चौकशी पोलिस करत असताना त्याने राहुल पवार या तरुणाने आपल्या साथीदारांच्या साह्याने आदित्य भांगरे याचे अपहरण करून त्याचा खून केला आणि त्याचा मृतदेह वापी, गुजराथ येथे नेऊन जाळल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन खात्री केली असता त्यांना त्या ठिकाणी मृतदेहाचे अवशेष आढळले. त्यामुळे आदित्य भांगरे यांच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून महाळुंगे इंगळे पोलीसठाण्यात आदित्य बेपत्ता असल्याच्या तक्रारीत खुनाच्या गुन्ह्याची वाढ करण्यात आली. या प्रकरणी भारतीय दंडविधान कलम ३६४,३०२,२०१,१२०(ब),२१२,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. त्याच बरोबर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (४), ३ ( ४ ) ( मोका) चा समावेशही या प्रकरणात करण्यात आला.
या प्रकरणातील सूत्रधार राहुल संजय पवार हा दाखलेबाज गुन्हेगार असून त्याच्यावर सन २०१३ पासून एकूण ०७ गुन्हे दाखल आहेत. तो पोलिसांना आपण आदित्य भांगरे याचा खून केल्याचे समजले हे कळताच फरार झाला होता. त्याने मोबाईल वापरणे बंद केले. डोक्यावरील केस आणि मिशा काढून टाकल्या होत्या. त्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांना जड जात होते. पोलिसांनी त्याच्या संपर्कातील ६७ व्यक्तींकडे चौकशी केली. त्याची वावरण्याची ठिकाणे असलेल्या नाशिकफाटा, कासारवाडी, पुणे भागातील दुकाने, चौक व मेट्रोस्टेशनची एकूण १२४ सी. सी. टी. व्ही. फुटेज तपासली. मात्र, त्याची माहिती मिळाली नाही. शेवटी पोलीसपथकाला हा आरोपी २२ एप्रिल रोजी औंध परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. पोलीसपथक तेथे जाऊन त्याची वाट पहात थांबले. तो रिक्षातून तेथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने आपले नाव सागर संजय मोरे असे असल्याचे सांगून आपण आळंदी येथील रहिवासी असल्याचे सांगत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.परंतु पोलिसांनी पोलिसीखाक्या दाखवल्यानंतर त्याने आपले नाव राहुल पवार असल्याचे सांगितले आणि आदित्य भांगरे याचा खून केल्याची कबुलीही दिली.
राहुल पवार याचा भाऊ रितेश पवार याचा खून शंभू भोसले,अभि जावळे, वैभव आंधळे,विनोद बटलवार,शेखर नाटक, छोटा साकेत यांनी सन २०२३ मध्ये केला होता. हे आरोपी सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. या पैकी शंभू भोसलेशी आदित्य भांगरेची मैत्री होती. आदित्यने रितेश याच्या खुनाबाबत आरोपींनी इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टस लाईक आणि शेअर केल्या होत्या. त्यामुळे बदला घेण्याच्या इराद्याने पेटून उठलेल्या राहुल पवार याने आदित्य बांगरे याचा अपहरण करून खून केला. हा प्रकार अमर शिंदे याने पोलिसांकडे कबूल केल्यामुळे उघडकीस आला. पोलिसांनी चिकाटीने तपास केल्यामुळे यातील सूत्रधार राहुल पवार गजाआड झाला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त वसंत परदेशी, उपआयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहाय्यकआयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक एच.व्ही.माने, उपनिरीक्षक अशोक जगताप, हजरत पठाण, अंमलदार प्रवीण तापकीर, सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण, गणेश मेदगे, विजय गंभिरे, सुनिल चौधरी, मयूर दळवी, नितीन गेंगजे, शाम बाबा, विजय तेलेवार, शुभम कदम, रामदास मोहीते, ज्ञानेश्वर गिरी, तौसिफ शेख, नागेश माळी व पोपट हुलगे यांनी केली आहे.
Reviewed by ANN news network
on
४/२६/२०२४ ०९:२६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: