अत्यावश्यक साधनसामग्रीच्या खरेदीसाठी समिती गठीत करण्याची गरज..
शिवसेनेच्या विजय गुप्तांचे पालिका रुग्णालयाच्या कारभारावर ताशेरे...
पिंपरी : महापालिकेच्या नेहरुनगर, भोसरी आणि आकुर्डी रुग्णालयाने गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम २०२१-२२ या स्पर्धेत अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला आहे. राज्य शासनाच्या पारितोषिकाकरीता त्यांची निवड झाली आहे. थेरगाव, जिजामाता आणि तालेरा रुग्णालयाने देखील प्रोत्साहनपर पारितोषिक मिळवले आहे. त्याबद्दल या रुग्णालयांचे अभिनंदन. परंतु, या रुग्णालयांच्या आरोग्य सेवांच्या गुणवत्तेत आणखी वाढ होण्याची गरज आहे. केवळ मुल्यांकनात दर्जा टिकवून चालणार नाही तर, रूग्णाभिमुख सेवांवर जास्तीचा भर देण्याची आवश्यकता आहे, असे मत शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) पिंपरी विधानसभा समन्वयक विजय गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
पत्रकात गुप्ता यांनी म्हटले आहे की, राज्य शासनाने शासकीय रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी
गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम २०२१-२२ चे आयोजन केले होते. या स्पर्धेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थेरगाव, जिजामाता आणि तालेरा रुग्णालयांनीदेखील चांगली कामगिरी केली. या पुरस्काराने पाठीवर कौतुकाची थाप जरी मिळणार असली तरी, रुग्णांच्या दैनंदिन लांबच-लांब लागणाऱ्या रांगापासून रुग्णांना मुक्ती मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) एक्सरे मशिन गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून बंद आहेत. एकूण तीन मशीनपैकी दोन मशिन बंद असून, उर्वरित एक मशिनदेखील बंद पडण्याच्या मार्गावर आहे. रुग्णालयात दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या दोन हजारांच्या घरात आहे. कोणत्याही आजारांची तपासणी करण्यासाठी एक्सरे व गर्भवतींसाठी सोनोग्राफी मशीन अत्यावश्यक आहे. सध्या एक्सरे काढण्यासाठी रुग्णांना दिवसभर ताटकळत रुग्णालयात बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अतिग्रस्त आजार असलेले रुग्ण सध्या खासगी रुग्णालयात धाव घेत आहेत. एक्सरे काढल्यानंतर अनेकांना एक्सरेची फिल्म देखील मिळत नाही. शिवाय, या विभागातील कर्मचारीदेखील मशिन बंद असल्याने दिवसभर बसून असल्याचे चित्र आहे. परिणामी, रुग्णांना खासगी रुग्णालयात धाव घेण्याची वेळ येते. तिथेही त्यांच्या पदरी निराशाच येते. आर्थिक लुट होते. अशीच काहीसी स्थिती पालिकेच्या इतर रुग्णालयांत देखील आढळून येते, असेही गुप्ता यांनी म्हटले आहे.
महापालिका आयुक्त आणि आरोग्य विभागाच्या प्रशासनाने समिती गठीत करून महापालिका रुग्णालयातील अत्यावश्यक साधनसामग्रीची पाहणी करावी. त्याचा लेखाजोखा आणि सविस्तर अहवाल तयार करून जलदगतीने निविदा प्रक्रिया राबवावी. तसेच अत्यावश्यक साधनसामग्री खरेदी करून ज्या-त्या रूग्णालयात पोहोच करावी. त्याचा प्रतीमाह आढावा घ्यावा आणि रुग्णांना दिलासा द्यावा. तरच हे पुरस्कार सत्कारणी लागतील अन्यथा केवळ दिखावा आणि डामडौल या एकेकाळच्या आशिया खंडातील श्रीमंत महापालिकेला भूषणावह नाही, असे या निवेदनात गुप्ता यांनी म्हटले.
पिंपरी : महापालिका रुग्णालयांचे अभिनंदन; परंतु, रूग्णाभिमुख सेवांवर हवा भर..
Reviewed by ANN news network
on
१२/१४/२०२२ ०९:५७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: