पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी, पवना व मुळा या नद्यांच्या पात्रांमध्ये जलपर्णी वाढली आहे. जलपर्णी अशुद्ध पाण्यात मोठ्याप्रमाणात वाढते. शहरातून वाहणारया या नद्यांमध्ये आजूबाजूच्या कारखान्यांमधून निर्माण होणारे सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे या नद्या प्रदूषित होत असून त्यामुळे जलपर्णी वाढीला पोषक वातावरण निर्माण होत आहे. परिणामी डास वाढत आहेत. त्यामुळे कारखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी चिखली, मोशी, पिंपरी चिंचवड हौसिंग फ़ेडरेशनने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात फ़ेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी, पवना व मुळा या नद्यांच्या पात्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढलेली आहे. त्यामुळे तिथे खूप मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होत आहे. तसेच नुकतेच पुणे शहरात झिका या डासांपासून होणाऱ्या भयंकर आजाराचे आपल्या शेजारील शहरात रुग्ण सापडले आहेत.झिका हा आजार साठलेल्या पाण्यात पैदास होणाऱ्या एडिस इजिप्ती या डासाच्या चावल्याने होणारा आजार आहे. आणि या डासाची पैदास प्रामुख्याने या जलपर्णी असणाऱ्या नदी प्रवाहात होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा विषय असल्याने या तिन्ही नद्यांमधील जलपर्णी ताबडतोब काढावी ही विनंती. अन्यथा झिका हा आजार मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे.
तसेच या तिन्ही नद्यांच्या आजूबाजूच्या कारखान्यांमधून निर्माण होणारे केमिकलयुक्त पाणी या नद्यांच्या पात्रात सोडले जाते. त्यामुळे या नद्यांचे खूप मोठ्या प्रमाणात पाणी प्रदूषित होत आहे. तरी संबंधित कारखाने यांच्यावर कारवाई करावी व हे पाणी सोडणे बंद करण्यास सांगावे आणि नद्यांचे पावित्र्या अबाधीत राखावे ही विनंती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: