पुणे : भोसरी येथे शोभायात्रा आणि कामधेनू यज्ञाद्वारे ‘कामधेनू महोत्सव’ अर्थात् ‘विश्‍व गो परिषदेस’ प्रारंभ !

 

भोसरी (पुणे) :  भोसरी येथील गोधाम (पांजरपोळ) येथे २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत ‘जनमित्र सेवा संघ’ आणि विविध सहयोगी सदस्य संस्था यांच्यावतीने आयोजित ‘कामधेनू महोत्सव’ अर्थात् ‘विश्‍व गो परिषदेस’ उत्साही वातावरणात शोभायात्रा आणि कामधेनू यज्ञाद्वारे प्रारंभ झाला. शोभायात्रेसाठी श्री श्री प.पू. १००८ यती अनिरुद्धानंदतीर्थजी महाराज यांची विशेष उपस्थिती होती, तसेच यज्ञही महाराजांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. परम महासंगणकाचे जनक पद्मश्री डॉ. विजय भटकर यांनी सकाळी यज्ञस्थळी भेट दिली. 

काळूबाई मंदिर ते पांजरपोळ पर्यंत शोभायात्रा ! 

प्रारंभी काळूबाई मंदिर ते पांजरपोळपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत प्रारंभी श्री श्री प.पू. यती अनिरुद्धानंदतीर्थजी महाराज यांच्या हस्ते देवीला श्रीफळ अर्पण करण्यात आला. यात्रेच्या अगोदर ‘ओम नमो भगवते वासुदेवासाय’, तसेच अन्य देवतांचा जयघोष करण्यात आला. शोभायात्रेत गोप्रेमी महिलांनी डोक्यावर कलश घेतला होता, तसेच विविध गोप्रेमींनी गायीच्या संदर्भात प्रबोधन करणारे फलक धरले होते. शोभायात्रेत विविध गोप्रेमी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

 कामधेनू यज्ञ 

यज्ञाच्या पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात प्रायश्‍चित्त कर्म, दशविधीस्नान प्रयोग, गोरक्षा आणि विश्‍वकल्याणासाठी संकल्प, वैदिक आचार्य यांच्याकडून गणपतिपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, आचार्य ब्राह्मणवर्णन, तसेच यज्ञशोभयात्रा झाली. यानंतर पुढील सत्रात यज्ञवास्तूमंडल पूजन, योगिनीपूजन, क्षेत्रपालपूजन, प्रधानदेवतापूजन (गोमाता-विष्णुपंचायतपूजन), नवग्रहदेवतामंडल पूजन, अरणीमंथन, यज्ञमंडपपूजन, नवग्रह हवन आणि महाआरतीने करण्यात आली.

यज्ञ २५ डिसेंबरअखेर चालणार आहे. या ‘कामधेनू महोत्सवा’स अधिकाधिक नागरिकांनी भेट देऊन याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजनकांनी केले आहे. या परिषदेस पद्मश्री डॉ. विजय भटकर, केंद्रीय गोसेवा आयोगाचे श्री. विनोदभाई कथेरिया, पांजरपोळ अध्यक्ष श्री. पिठ्ठी, कार्यकारी अध्यक्ष श्री. ओमप्रकाश रांका, तसेच आमदार श्री. महेशजी लांडगे आणि आमदार श्री. लक्ष्मणराव जगताप यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. 

क्षणचित्रे

१. शोभायात्रा पांजरपोळ येथे आल्यावर अनेक गोमाता उत्कंठेने शोभायात्रेकडे पहात होत्या, काही हंबरत होत्या जणू त्याही या सगळ्या परिषदेत सहभागी आहेत. 

२. ‘गावो विश्‍वस्य मातर: अर्थात गाय संपूर्ण विश्‍व की माता है’, ‘माता बनकर दूध पिलाय, वैद्य बनकर रोग मिटाए, चलता-फिरता है औषधालय’, ‘गाय मौन संदेश से, करती है उपकार, भला करे, करते रहे, मानव इन संसार’, अशा तर्‍हेचा प्रबोधन करणार्‍या मजकुराचे फलक गोप्रेमींनी हातात धरले होते.

३. अत्यंत उत्साही वातावरणात होत असलेल्या या परिषदेस देशभरातून विविध गोप्रेमी संस्था, संघटना त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी आहेत.

४. परिषदेच्या ठिकाणी विविध गोरक्षण करणार्‍या संघटना, संस्था यांचे माहिती देणारे कक्ष लावण्यात आले आहेत. 

परिषदेत उभाण्यात आलेल्या कक्षांच्या ठिकाणी दैनिक ‘सनातन प्रभात’चा ही एक उभारण्यात आला आहे. त्यात ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून गोरक्षणाच्या संदर्भात होत असलेले कार्य, तसेच सनातन प्रभातच्या माध्यमातून होत असलेले राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य यांविषयी माहिती देणारे फलक लावले आहेत.

पुणे : भोसरी येथे शोभायात्रा आणि कामधेनू यज्ञाद्वारे ‘कामधेनू महोत्सव’ अर्थात् ‘विश्‍व गो परिषदेस’ प्रारंभ ! पुणे : भोसरी येथे  शोभायात्रा आणि कामधेनू यज्ञाद्वारे ‘कामधेनू महोत्सव’ अर्थात् ‘विश्‍व गो परिषदेस’ प्रारंभ ! Reviewed by ANN news network on १२/२१/२०२२ १०:४९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".