पुणे : आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

 


पुणे : कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार व माजी महापौर सौ.मुक्ता शैलेश टिळक यांचे आज दुपारी साडेतीन वाजता निधन झाले.

 गेले काही दिवस त्या आजारी होत्या,  त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी  ९ ते ११  यावेळेत केसरीवाडा येथे राहत्या घरी ठेवण्यात येईल. अंत्यविधी वैकुंठ स्मशानभूमी येथे  सकाळी अकरा नंतर होणार आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली

 'लोकमान्य टिळकांचा वारसा लाभलेलं एक लढवय्ये नेतृत्व आपण आज गमावलं,' अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, लोकमान्य टिळकांचा वारसा असला तरी आपल्या कामातून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यामुळेच पुणे महापालिकेत सलग चार वेळा नगरसेविका नंतर पुण्याच्या महापौर आणि आमदार हा प्रवास त्या करू शकल्या. कर्करोगाशी झुंज देत असतांनाही राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून आपल्या कर्तव्य भावनेचा परिचय त्यांनी दिला. कर्तव्यनिष्ठ, लढवय्ये नेतृत्व आपण गमावले आहे. आमदार मुक्ता टिळक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली

 पुण्याच्या माजी महापौर आणि भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले आहे, अशा शोकसंवेदना व्यक्त करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, मुक्ताताई या भारतीय जनता पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या होत्या. सुमारे 30 वर्ष त्यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले. पुण्याच्या महापौर म्हणून त्यांनी शहरात विविध विकासकामांना चालना दिली होती. विधानसभा सदस्य म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कर्तव्यांना प्राधान्य दिले. अलिकडेच झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी आजारपणातही मतदानात सहभाग नोंदवून लोकशाहीवरील आपली निष्ठा तसेच पक्षाचा उमेदवार जिंकलाच पाहिजे, यासाठी पक्षनिष्ठा दाखवून दिली होती. मी त्यांना या आजारपणात न येण्याची विनंती करून सुद्धा त्या दोन्ही निवडणुकीत रुग्णालयातून मतदानाला आल्या होत्या. पुण्यात विविध सामाजिक कामे करताना सर्वसामान्य जनता आणि विशेषतः महिलांच्या जीवनात बदल घडवून आणण्याला त्यांचे प्राधान्य होते. या कठीण प्रसंगात आम्ही सारेच त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबियांना लाभो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.


पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली

कसबा मतदारसंघाच्या  आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने पुण्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे,अशा शब्दात  शोकसंवेदना व्यक्त करून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी  त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मुक्तताई सदैव स्मरणात राहतील.  मुक्तताई या भारतीय जनता पक्षच नव्हे, तर सर्व राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांसाठी आदर्शवत होत्या. संघटन विस्तारासाठी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही त्या सदैव कार्यमग्न राहिल्या. उत्तम संघटन कौशल्य आणि व्यापक जनसंपर्क हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील वाखाणण्याजोगे गुण होते. महापालिकेच्या गटनेत्या, स्थायी समितीच्या सदस्या, विरोधीपक्षनेते पद आदी जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या.  २०१७ मध्ये पुणे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला निर्विवाद यश मिळाल्यानंतर पक्षाने मुक्ताताईंकडे महापौरपदाची जबाबदारी सोपवली. आपल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी पुण्याच्या विकासात भरीव योगदान दिलं. 

मुक्ताताईंच्या जाण्याने एका प्रामाणिक कार्यकर्तीला आणि कर्तव्यनिष्ठ लोकप्रतिनिधीला मुकलो, असे पालकमंत्री श्री. पाटील यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.


निष्ठावान कार्यकर्ती आणि सेवाव्रती लोकप्रतिनिधीला मुकलो :  सुधीर मुनगंटीवार

मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे एका निष्ठावान कार्यकर्तीला आणि सेवाव्रती लोकप्रतिनिधीला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक व्यक्त केला आहे.

मुक्ता टिळक गेले काही महिने गंभीर आजाराशी झुंजत होत्या. त्याही परिस्थितीत त्या विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीसाठी स्ट्रेचरवरून उपस्थित राहिल्या होत्या, असे सांगून श्री मुनगंटीवार पुढे म्हणाले की मुक्ताताईंनी आपल्या कृतीतून कार्यकर्त्यांसमोर एक आदर्श उभा केला आहे. लोकमान्य टिळकांच्या घराण्यातील सून म्हणून वावरतांना जनसेवेचा आणि जनजागरणाचा लोकमान्यांचा वसा त्यांनी पुढे चालविला. भाजपाचे काम करतांना त्यांचे सेवाव्रती व्यक्तिमत्व बहरून आले. पुण्याच्या महापौर म्हणून त्यांनी आपला ठसा जसा उमटवला तसेच कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार म्हणून मिळालेल्या अल्पकाळातही त्यांनी आपले नाव जनमानसात कोरले. कोरोना काळात आणि त्यापूर्वी त्यांनी केलेली जनसेवा पुणेकर आणि भाजपा कार्यकर्ते विसरणार नाहीत.

आम्ही टिळक कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वर मुक्ताताईंना सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबीय आणि मित्र परिवार व कार्यकर्त्यांना या दुःखातून लवकर सावरण्याचे बळ देवो अशी प्रार्थनाही ना.श्री. मुनगंटीवार यांनी केली आहे.

पुणे : आमदार मुक्ता टिळक यांचे निधन पुणे : आमदार मुक्ता टिळक यांचे निधन Reviewed by ANN news network on १२/२२/२०२२ ०८:२१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".