प्राचीन भारतीय संस्कृती व्याख्यानमाला
पिंपरी : चिंचवड येथे सुरू असलेल्या ङ्कप्राचीन भारतीय संस्कृतीङ्ख व्याख्यानमालेत बुधवारी रोजी ’वारसा’ या पहिल्या सत्रांतर्गत ’स्थापत्य’ या विषयातील ’मंदिरे’ याविषयी डॉ. प्रमोद दंडवते यांनी विस्तृत माहिती दिली.
भारतात सर्वात जुने मंदिर चौथ्या शतकात गुप्तकाळात उभारले गेले. सांची, विदिशा, जबलपूर, कानपूर, कोटा, नालंदा येथील मंदिरे प्राचीन मानली जातात. महाराष्ट्रात उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर नदीच्या काठावरचे चौथ्या शतकातील मंदिर हे सर्वात प्राचीन मानले जाते. भीमा नदीच्या काठावरचे पळसनाथ मंदिर, मोरगाव जवळील शिवमंदिर, अंबरनाथ येथील शिवमंदिर, सिन्नर येथील गोंडेश्वर मंदिर, कोल्हापूरपासून साठ किलोमीटर अंतरावरील खिद्रापूरचे मंदिर हे ’महाराष्ट्राचे खजुराहो’ म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे ही यादवकालीन आहेत.
’वारसा’ या सत्रातील दुसर्याण भागात डॉ. श्रीकांत गणवीर यांनी ’लेणी’ या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. डॉ. गणवीर म्हणाले की, भारतात एकूण अठराशेपेक्षा जास्त लेणी अस्तित्वात आहेत. त्यापैकी पंचाहत्तर टक्के लेणी ही महाराष्ट्रात आढळतात. अश्मीभूत खडक हा लेणी कोरण्यासाठी उत्तम मानला जातो. तो दगड महाराष्ट्रात विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. इसवी सन पूर्व दुसर्याम शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत लेणी कोरण्याची परंपरा अव्याहतपणे सुरू होती. जैन, बौद्ध आणि हिंदू धर्मात लेणी कोरण्याची परंपरा होती. स्थपती आणि शिल्पी हे कारागीर लेणी कोरण्यात निपुण होते.
’वारसा’ या सत्रातील तिसर्याे भागात डॉ. अरुणचंद्र पाठक यांनी ’पारंपरिक जलव्यवस्थापन’ या विषयावर सविस्तर माहिती दिली. पाणी ही माणसाची मूलभूत गरज असल्याने पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी माणूस वस्ती करून राहतो. पारंपरिक जलव्यवस्थापनाचा अतिशय उत्तम नमुना कान्हेरी लेणी येथे पाहायला मिळतो. गडकिल्ल्यांवर पारंपरिक जलव्यवस्थापनाची उत्कृष्ट व्यवस्था आढळून येते. महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन कुंड हे तेर येथे आहे. मुखेड, इडोली येथील बारव (विहिरी) अतिशय प्राचीन आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील जागजी येथील बारव खूप सुंदर असून गुजरातमध्ये नऊ मजली बारव अस्तित्वात असून तिला ’बारवांची राणी’ असे म्हटले जाते, असे सांगितले.
’राखीगढी संशोधन - भाग 1’ या व्याख्यानातून ज्येष्ठ पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. वसंत शिंदे यांनी सुमारे साडेपाच हजार वर्षे प्राचीन असलेल्या हडप्पा संस्कृतीचा विस्तृत आढावा घेतला. गुजरातमधील लोथल हे जगातील पहिले बंदर असून देश ही संकल्पना हडप्पा संस्कृतीमध्ये जगात सर्वात पहिल्यांदा अस्तित्वात होती, असे प्रतिपादन डॉ. वसंत शिंदे यांनी केले. सहभागी वक्त्यांनी सचित्र सादरीकरणाच्या साहाय्याने विषयाची मांडणी केल्याने क्लिष्ट विषय असूनही श्रोत्यांना सहज आकलन झाले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी अध्यक्षीय मनोगतातून, आपला इतिहास जगात प्राचीन असूनही नीटपणे मांडला गेला नाही म्हणून भारतीयांच्या मनात त्याविषयी संभ्रम आहे; परंतु अशा कार्यशाळांच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीची खरी ओळख होईल! असे विचार मांडले.
खासदार विनय सहस्रबुद्धे, पद्मश्री गिरीश प्रभुणे, रवी नामदे, अॅसड. सतीश गोरडे, डॉ. सुनील भणगे, डॉ. शकुंतला बन्सल यांची प्रमुख उपस्थिती होती. मयूरेश प्रभुणे यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. गतिराम भोईर यांनी आभार मानले.
चिंचवड येथील व्याख्यानमालेत मंदिरे, लेणी, जलव्यवस्थापन यावर प्रकाशझोत
Reviewed by ANN news network
on
१२/३०/२०२१ १०:१६:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: