लोणावळा : पर्यटननगरी म्हणून ओळख असलेल्या लोणावळा शहरातील प्रदुषण कमी करण्यासाठी माझी वसुंधरा माझा अभिमान व स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2022 अंतर्गत लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने गुरुवारी सकाळी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 500 हून अधिक नागरिक या उपक्रमात सायकली घेऊन सहभागी झाले होते . प्रसिद्ध सिनेअभिनेते सिध्दार्थ जाधव यांच्या हस्ते झेंडा दाखवत ह्या सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला .
तीन गटात ही सायकल रॅली झाली. ह्यामध्ये लहान मुलाचा गट लोणावळा नगरपरिषद कार्यालय ते मावळा पुतळा, ठोंबरेवाडी, सिद्धार्थनगर व पुन्हा नगरपरिषद कार्यालय ह्या मार्गाने सोडण्यात आला . त्यानंतर महिला व मुलींचा गट नगरपरिषद कार्यालय ते मावळा पुतळा , पुढे रायवुड व भुशी धरण मार्गे आयएनएस शिवाजी गेट व पुन्हा नगरपरिषद कार्यालय तर पुरुष व युवकाचा गट नगरपरिषद कार्यालय ते मावळा पुतळा, कुमार चौक, मिनू गॅरेज मार्गे डॉन बॉस्को, तुंगार्ली, वलवण, नांगरगाव, भांगरवाडी मार्गे पुन्हा नगरपरिषद कार्यालय असा सोडण्यात आला .
नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष दिलीप दामोदरे, स्वच्छता आणि आरोग्य सभापती रचना सिनकर, नगरसेवक श्रीधर पुजारी, सुधिर शिर्के, भाजपाचे गटनेते देविदास कडू, नगरसेविका ब्रिंदा गणात्रा, मंदा सोनवणे, सुवर्णा अकोलकर, संध्या खंडेलवाल, ललित सिसोदिया, माजी नगरसेवक विशाल पाडाळे यांच्यासह लोणावळा सायकल क्लबचे सदस्य, शिवदुर्ग मित्र, लायन्स क्लब, लोणावळा शहर मराठी पत्रकार संघ, जेष्ठ नागरिक संघ आदी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते .
रॅलीच्या समारोप प्रसंगी सिनेअभिनेत्री आणि लोणावळा शहराच्या ब्रँड अॅ म्बेसिडर आयेशा झुल्का उपस्थित होत्या. यावेळी लोणावळा नगरपरिषदेचा वतीने स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या पोस्टर स्पर्धा, जिंगल स्पर्धा, निबंध स्पर्धा, वॉल पेंटिंग, शॉर्ट मुव्ही आदी स्पर्धा विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आली.
त्यानंतर लोणावळा नगरपरिषद ते ट्रायोज मॉल आणि परत लोणावळा नगरपरिषद या मार्गावर प्लॉग ओ थॉन रन चे आयोजन करण्यात आले होते. या रन मध्ये रस्त्याने धावताना रस्त्यावर पडलेला कचरा उचलून तो जमा करण्यात आला. सुमारे 200 विद्यार्थी आणि नागरिकांनी यात सहभाग घेतला होता.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोणावळा शहराने सलग चार वेळा देशात क्रमांक मिळवत चौकार मारला आहे. यावर्षी लोणावळा शहर प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी सज्ज झाले असून सोबतच राज्य शासनाच्या माझी वसुंधरा माझी जबाबदारी ही मोहिम देखील शहरात यशस्वीपणाने राबविण्यासाठी नगरपरिषदेने कंबर कसली आहे . याकरिता जमिनीची धूुप रोखण्यासाठी वृक्षारोपण मोहीम , ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी नो हॉर्न प्लिज हा उपक्रम व आता शहरातील वायूु प्रदुषण रोखण्यासाठी आठवड्यातील एक दिवस नो व्हेईकल डे जाहीर करण्यात आला आहे . याबाबतची जनजागृती करण्यासाठी ही सायकल रॅली आयोजित केली असल्याचे नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी सांगितले .
लोणावळा शहरात सायकल फेरीचे आयोजन
Reviewed by ANN news network
on
१२/३०/२०२१ १०:२५:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: