ठाणे (विशेष प्रतिनिधी): ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून सोन्याच्या साखळ्या चोरी करणाऱ्या तसेच पोलीस असल्याची बनावट ओळख दाखवून लुटणाऱ्या सराईत ईराणी टोळीच्या एका सराईत आरोपीला अटक करण्यात ठाणे गुन्हे शाखेच्या 'मालमत्ता गुन्हे कक्षा'ला यश आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून २२ गुन्हे उघडकीस आणले असून त्याच्या ताब्यातून तब्बल ३२ लाख ३० हजार ५०० रुपये किमतीचे २२७.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ५ ग्रॅम चांदी हस्तगत केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद झाकीर सैय्यद उर्फ मोहम्मद सांगा उर्फ मम्मू इराणी (रा. रशीद कंपाऊंड, कौसा, मुंब्रा, ठाणे) असे आहे. ठाणे शहरात चेन स्नॅचिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तांनी दिलेल्या विशेष सूचनांनुसार गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत होते. वागळे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ७०३/२०२६ (भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३(५)) चा तपास करताना मालमत्ता कक्षाचे अधिकारी आणि कर्मचारी यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचे नाव निष्पन्न झाले. पोलिसांनी मुंब्रा परिसरात सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूरमधील २२ गुन्हे उघड
अटक आरोपी मोहम्मद इराणी याची पोलिसांच्या पथकाने कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने ठाणे शहर, डोंबिवली, कल्याण, बदलापूर आणि भिवंडी परिसरात सोन्याच्या साखळ्या खेचणे (चेन स्नॅचिंग) आणि पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटल्याची कबुली दिली. त्याच्या वाटणीस आलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. या कारवाईमुळे विष्णूनगर, नगर, वागळे इस्टेट, बदलापूर पश्चिम, चितळसर, बदलापूर पूर्व, ठाणेनगर, राबोडी, कोळसेवाडी, शिळडायघर, डोंबिवली आणि भिवंडी शहर पोलीस ठाण्यांतील एकूण २२ गुन्हे उघडकीस आले आहेत.
महाराष्ट्र व गुजरात राज्यात २० गुन्हे दाखल असलेला सराईत भामटा
अटक करण्यात आलेल्या या आरोपीची पार्श्वभूमी अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाची आहे. यापूर्वी त्याच्याविरोधात ठाणे, कल्याण, नवी मुंबई, अहिल्यानगर आणि गुजरात राज्यातील मेहसाणा, कामरेज व उमरा परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये चेन स्नॅचिंग व पोलिसांची बनावट ओळख सांगून लुटण्याचे तब्बल २० गुन्हे नोंदवलेले आहेत. याशिवाय, वागळे इस्टेट आणि कापूरबावडी पोलीस ठाण्यातील ३ गंभीर गुन्ह्यांमध्ये तो दीर्घकाळापासून पोलीस अभिलेखावर हवा (वॉन्टेड) होता.
ही कारवाई ठाणे सहआयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहाय्यक आयुक्त (गुन्हे शोध-२) विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मालमत्ता गुन्हे कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक निरीक्षक रोहित केदार, विश्वास शिंगाडे, उपनिरीक्षक शीतल पाटील, संजय भिसे, सहाय्यक उपनिरीक्षक शिवाजी गायकवाड, राजेश क्षत्रिय, हवालदार प्रशांत भुर्के, राहुल शिरसाट, उमेश मोते, शशिकांत यादव, नाईक सचिन कोळी, तौसिफ सय्यद, निळकंठ लोंढे, अंमलदार महेश सावंत,हवालदार आशा गोळे आणि अंमलदार सदन मुळे यांच्या पथकाने यशस्वी केली. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक विश्वास शिंगाडे करत आहेत.
Labels: Thane Police, Crime Branch Thane, Chain Snatching Thane, Irani Gang Arrest, Property Cell Thane, Mumbra News
Search Description: Thane Police Property Cell arrests notorious Irani chain snatcher Mohammad Zakir Sayyed, solves 22 cases and recovers gold jewellery worth Rs 32.30 lakh.
Hashtags: #ThanePolice #ChainSnatching #IraniGang #ThaneCrime #PropertyCell #MaharashtraPolice #PoliceAction
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: