४० लाखांची जबरी चोरी उघड; २४ तासांत ६ दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या


कल्याण (विशेष प्रतिनिधी): कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौक ते लालचौकी रस्त्यावर भरदिवसा दुचाकीवरून जाणाऱ्या व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्यांना गाठून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत ४० लाख रुपयांची रोकड हिसकावून नेणाऱ्या सहा दरोडेखोरांना ठाणे गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांच्या आत गजाआड केले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या या सहा आरोपींकडून चोरीस गेलेली रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली असा एकूण ३६ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही घटना १५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १:०५ वाजताच्या सुमारास घडली होती. उल्हासनगर येथील 'क्रांती फूड एजन्सी'चे दोन कर्मचारी एजन्सीचे ४० लाख रुपये घेऊन बँक ऑफ बडोदाच्या कल्याण पश्चिम शाखेत भरणा करण्यासाठी स्कुटीवरून सहजानंद चौकाकडून लालचौकीकडे जात होते. त्यावेळी आधीच पाळत ठेवून असलेल्या दोन दुचाकींवरील चार अनोळखी इसमांनी कर्मचाऱ्यांच्या स्कुटीला जोरदार लाथ मारून त्यांना रस्त्यावर पाडले. त्यानंतर कर्मचाऱ्यांना जबर मारहाण करत ४० लाख रुपये असलेली बॅग हिसकावून आरोपी पसार झाले होते. याप्रकरणी फारूख इस्माईल अत्तार यांनी दिलेल्या तक्रारीवरून कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०९ (६), ३(५) आणि ६१(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
 
तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराच्या आधारे कारवाई

घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणे गुन्हे शाखेच्या कल्याण पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास तात्काळ सुरू केला. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनेच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय केले. अत्यंत कौशल्याने आणि अथक प्रयत्नांनंतर दरोड्याचा कट रचणाऱ्या व प्रत्यक्ष चोरी करणाऱ्या सर्व सहा आरोपींची माहिती निष्पन्न झाली आणि पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये समीर अख्तर शेख (वय २८, रा. वालधुनी, कल्याण पूर्व), आफताब अस्लम खान (वय २५, रा. महागिरी कोळीवाडा, ठाणे), शहानवाज गफार हसन अन्सारी (वय ३६, रा. शिवनगर, अंबरनाथ पश्चिम), सोहेब युन्नूस शेख (वय २४, रा. कोनगाव, भिवंडी), मुझाहिद अन्वर खान (वय २४, रा. पहिली राबोडी, ठाणे पश्चिम) आणि शाहीद इसाक शेख (वय १९, रा. दुसरी राबोडी, ठाणे) यांचा समावेश आहे.
३६ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त; २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

पोलिसांनी सर्व आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी या जबरी चोरीची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून दरोड्यातील रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली असा एकूण ३६,४८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना २२ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे.

ही कामगिरी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहआयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले,  उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहाय्यक  आयुक्त (शोध-१) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अजित शिंदे, निरीक्षक महेश काळे, सहाय्यक निरीक्षक सर्जेराव पाटील, गणेश दळवी, उपनिरीक्षक किरण भिसे, अंमलदार दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, विजय जिरे, अधिक जाधव, दत्तप्रसाद महाजन, सुधीर कदम, सचिन भालेराव, पांडुरंग भांगरे, सचिन कदम, विलास कडू, गोरखनाथ पोटे, प्रशांत वानखेडे, उल्हास खंडारे, युवराज ठेपणे, प्रवीण किनरे, गुरुनाथ जरग, विनोद चन्ने, मिथुन राठोड, गोरक्ष शेकडे, सतीश सोनवणे, गणेश हरणे, महिला अंमलदार मंगल गावित, पूनम खरात आणि चालक सहाय्यक उपनिरीक्षक अमोल बोरकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.


  • Labels: Thane Police, Crime Branch Thane, Kalyan Crime News, Robbery Arrest Kalyan, Ashutosh Dumbere, Bazarpeth Police Station

  • Search Description: Thane Crime Branch detects 40 lakh robbery in Kalyan within 24 hours, arrests 6 accused and recovers property worth Rs 36.48 lakh.

  • Hashtags: #ThanePolice #CrimeBranch #KalyanNews #RobberySolved #MaharashtraPolice #KalyanCrime #PoliceAction

४० लाखांची जबरी चोरी उघड; २४ तासांत ६ दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या  ४० लाखांची जबरी चोरी उघड; २४ तासांत ६ दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या Reviewed by ANN news network on ९/२५/२०२६ १०:४६:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".