झुलेलाल सोसायटी ते नॅच्यूरल आईस्क्रीम रस्ता विकासाला मुहूर्त: नाना काटे यांच्या पुढाकाराने खाजगी विकसकामार्फत होणार काम!
पिंपळे सौदागर (१८ ऑगस्ट २०२६): पिंपळे सौदागर परिसरातील झुलेलाल सोसायटी, ट्रायोज सोसायटी ते नॅच्यूरल आईस्क्रीम दरम्यान गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेला १८ मीटर रुंदीचा रस्ता अखेर विकसित होणार आहे. माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या पुढाकारातून खासगी विकसकाच्या माध्यमातून हे काम हाती घेण्यात आले असून येत्या ६ महिन्यांच्या मुदतीत ते पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या सुमारे ९ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पामुळे परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असून हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाची पाहणी आणि परिसरातील रहिवाशांशी संवाद साधण्यासाठी नाना काटे यांच्या उपस्थितीत ट्रायोज सोसायटी, झुलेलाल टॉवर सोसायटी आणि सुखवाणी सेलिनो सोसायटीमधील नागरिकांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत स्थानिक रहिवाशांनी गेल्या १० वर्षांपासून अपूर्ण राहिलेल्या रस्त्यामुळे दररोज भेडसावणाऱ्या वाहतूक अडचणी, धुळीचा त्रास आणि सुरक्षेचे प्रश्न मांडले.
यावेळी महापालिकेचे कार्यकारी अभियंता, उपअभियांता व कनिष्ठ अभियंता यांच्यासह असावानी प्रमोटर्स अँड बिल्डर्सचे प्रमुख श्रीेशेठ असवानी, युनिटेक्स इन्फ्राचे प्रतिनिधी घाडगे आणि संबंधित सोसायट्यांचे चेअरमन व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा रस्ता सुखवाणी प्रमोटर्स अँड बिल्डर्स यांच्यामार्फत विकसित केला जाणार असून प्रत्यक्ष बांधकामाची जबाबदारी युनिटेक्स इन्फ्रा या कंत्राटदाराकडे सोपवण्यात आली आहे. या ९ कोटी रुपयांच्या कामाच्या बदल्यात महापालिकेकडून संबंधित विकसकाला टीडीआर (TDR) किंवा एफएसआय (FSI) च्या स्वरूपात मोबदला दिला जाणार असल्याची माहिती नाना काटे यांनी दिली.
केवळ रस्ता बांधणीवर न थांबता या प्रकल्पांतर्गत अंतर्गत पायाभूत सुविधांचाही कायापालट केला जाणार आहे. यामध्ये पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी स्ट्रॉर्म वॉटर लाईन, ड्रेनेज लाईन, भूमिगत वीज केबल, नागरिकांसाठी पदपथ (फुटपाथ) आणि उच्च दर्जाच्या काँक्रीट रस्त्याचा समावेश आहे. गेल्या दशकाभरात वेळोवेळी केवळ आश्वासनेच मिळाली होती, मात्र आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
Labels:
Pimple Saudagar,PCMC Infrastructure,Road Development,Nana Kate,Pimpri Chinchwad News,Urban DevelopmentSearch Description:
18-meter pending road in Pimple Saudagar to be developed at 9 crore cost within 6 months through private developer TDR model. Get full details.Hashtags:
#PimpleSaudagar #PCMC #RoadDevelopment #PimpriChinchwad #InfrastructureNews
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: