दाभोसा ग्लास स्कायवॉकचे लोकार्पण; पालघर जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि स्थानिक रोजगाराला मिळणार मोठी चालना
पालघर (१५ ऑगस्ट २०२६): पालघर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध आणि निसर्गरम्य दाभोसा धबधबा पर्यटनस्थळाचा कायापालट करणारा आकर्षक 'ग्लास स्कायवॉक' अखेर पर्यटकांच्या सेवेत दाखल झाला आहे. भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या नयनरम्य ग्लास स्कायवॉकचे लोकार्पण वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले. या अत्याधुनिक प्रकल्पामुळे दाभोसा पर्यटनस्थळाकडे देशातीलच नव्हे तर परदेशातील पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढणार असून, याद्वारे स्थानिक आदिवासी तरुणांना आणि नागरिकांना रोजगाराच्या विपुल संधी उपलब्ध होतील, असा ठाम विश्वास पालकमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.
या लोकार्पण सोहळ्याला खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये, जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, जव्हारच्या प्रकल्प अधिकारी अपूर्वा बासुर, उपवनसंरक्षक सैफुन शेख, भारतीय प्रशासन सेवेतील प्रशिक्षणार्थी पी. व्ही. अमल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र केनी, सरपंच योगिता माडी यांच्यासह विविध क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालघरला देशाच्या पर्यटन व आर्थिक नकाशावर मिळवून देणार अव्वल स्थान
पालघर जिल्ह्याची भौगोलिक रचना आणि नैसर्गिक समृद्धी यावर प्रकाश टाकताना पालकमंत्री गणेश नाईक म्हणाले, "पालघर जिल्ह्याला अथांग समुद्रकिनारा आणि हिरवागार डोंगराळ भाग अशी दुहेरी नैसर्गिक देणगी लाभली आहे. मुंबई, अहमदाबाद, दिल्ली आणि कोलकाता यांसारख्या देशातील प्रमुख शहरांशी पालघरची कनेक्टिव्हिटी वेगाने सुधारत आहे. प्रस्तावित विमानतळ, बुलेट ट्रेन प्रकल्प आणि विविध राष्ट्रीय महामार्गांच्या विस्तारीकरणामुळे जिल्ह्याच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक समुद्रकिनारा आणि ऐतिहासिक, नैसर्गिक पर्यटनस्थळ विकसित करण्याचा सरकारचा स्पष्ट मानस असून, पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे शाश्वत साधन उपलब्ध करून दिले जाईल."
दाभोसा येथील ग्लास स्कायवॉक हे केवळ एका मोठ्या योजनेचे सुरुवातीचे पाऊल असल्याचे सांगत त्यांनी जव्हार तालुक्यातील इतर पर्यटनस्थळांचाही कायापालट करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. स्कायवॉक परिसरात पर्यटकांसाठी प्रशस्त पार्किंग, उपहारगृहे, विश्रामगृह आणि इतर नागरी सुविधा वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था अन् महिला बचतगटांचा आर्थिक सबलीकरण
पर्यटन विकासाचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ स्थानिक पातळीवर पोहचला पाहिजे, यावर भर देत पालकमंत्र्यांनी एक महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. स्कायवॉक प्रवेश शुल्क आणि पार्किंग व्यवस्थेतून मिळणाऱ्या एकूण महसुलातील काही निश्चित हिस्सा स्थानिक ग्रामपंचायतीला मिळावा, जेणेकरून गावाच्या विकासाला हातभार लागेल. याशिवाय स्थानिक महिला बचतगटांना पर्यटनाच्या साखळीशी जोडून त्यांच्यासाठी हस्तकला, स्थानिक खाद्यपदार्थ आणि मार्गदर्शक (गाईड) म्हणून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले.
'होम-स्टे' संकल्पनेतून आदिवासी बांधवांचे स्थलांतर रोखणार
आदिवासी बांधवांच्या रोजगाराचा आणि राहणीमानाचा प्रश्न सोडवण्यासाठी 'होम-स्टे' (Home-Stay) संकल्पना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्याची गरज पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. पर्यटकांना स्थानिक आदिवासी कुटुंबांच्या पारंपरिक घरांमध्ये राहण्याचा आणि त्यांच्या संस्कृतीचा अनुभव घेण्याचा आनंद मिळावा, यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळणाऱ्या अनुदानासोबतच पर्यटकांसाठी अतिरिक्त खोली आणि स्वच्छतागृह उभारण्यासाठी स्थानिक कुटुंबांना बँकांच्या माध्यमातून कर्ज किंवा इतर आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी. यामुळे आदिवासी कुटुंबांना थेट उत्पन्न मिळेल आणि रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यास मोठी मदत होईल.
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही निगराणी अन् अन्न सुरक्षेची मोहीम
दाभोसा स्कायवॉक पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता, सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला. स्कायवॉकची निश्चित भारवहन क्षमता, नियंत्रित प्रवेशव्यवस्था आणि संपूर्ण परिसरात अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. स्कायवॉकची सीसीटीव्ही यंत्रणा थेट स्थानिक पोलीस ठाण्याशी जोडण्याचे निर्देश त्यांनी दिले, जेणेकरून अनुचित प्रकारांवर तातडीने नियंत्रण मिळवता येईल.
तसेच पर्यटनस्थळी येणाऱ्या पर्यटका आरोग्याची काळजी घेण्यासाठी खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) सहकार्याने संपूर्ण पालघर जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबवून पर्यटकांना दर्जेदार आणि सुरक्षित अन्नपदार्थ मिळतील याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी दिले. लहान-मोठे रिसॉर्ट्स आणि पर्यटन उद्योजकांना कायद्याच्या चौकटीत राहून सुलभ परवानग्या व शासकीय मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी प्रशासन पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
आगामी तीन वर्षे चार महिन्यांच्या कार्यकाळात पालघर जिल्ह्यात मूलभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा आणि वाहतूक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त करत पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणाची सांगता केली.
Labels:
Dabhosa Glass Skywalk, Palghar Tourism, Ganesh Naik, Jawhar Tourism, Palghar News, Glass Skywalk India, Maharashtra Tourism
Search Description:
Palghar Guardian Minister Ganesh Naik inaugurated the Dabhosa Glass Skywalk in Jawhar on Independence Day 2026, boosting local tourism and tribal employment.
Hashtags:
#DabhosaSkywalk #PalgharTourism #GaneshNaik #Jawhar #GlassSkywalk #MaharashtraTourism #PalgharNews #TribalEmployment #HomeStay
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: