१४ नर्मदा परिक्रमा : इंद्रेश्वर ते अविधा: सेवा आणि मानवी स्वभावाचे विविध रंग

 


१४ नर्मदा परिक्रमा :  इंद्रेश्वर ते अविधा: सेवा आणि मानवी स्वभावाचे विविध रंग

२५ डिसेंबरला सकाळी आम्ही कांदोराजमधील कार्तिकस्वामी आश्रमातून बाहेर पडलो. नांवरा, वराछा मार्गे चालत आम्ही इंद्रोर गावात पोहोचलो. रस्त्याच्या बाजूलाच इंद्रेश्वर महादेव तीर्थ आहे. मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. सुमारे वीस किलोमीटर चालून आम्ही इथे पोहोचलो होतो. दुपारची भोजनप्रसादी याच इंद्रेश्वर महादेव आश्रमात घेतली. सकाळी निघताना पिळलेले ओले कपडे बरोबर घेतले होते, ते तिथे वाळत टाकले. या ठिकाणी पुन्हा एकदा पूर्वी भेटलेले श्री करंदीकर यांची भेट झाली. त्यांनी परिक्रमा मार्गाच्या संदर्भात एक पीडीएफ मला शेअर केली. आश्रमात भंडारीबाबा एकटेच असल्यामुळे भोजनप्रसादी तयार व्हायला थोडा वेळ लागला, त्यामुळे पुढे निघायला उशीर झाला.

भोजन घेऊन आम्ही तिथून निघालो आणि सायंकाळी वेलुगाममध्ये पोहोचलो. येथे वालुकेश्वर महादेवाचे तीर्थ आहे. रात्री त्याच गावात मुक्काम केला. सकाळी तेथून बाहेर पडून भावपूर मार्गे सरसाड येथे पोहोचलो. तिथे गुप्त गोदावरी तीर्थ आहे. मूळ रस्ता सोडून थोडेसे आत जावे लागते. आम्ही तिथे गेलो. दर्शन घेतले. अचानक सत्संगी महाराजांना तिथे स्नान करण्याची हुक्की आली. त्यांच्या या सोहळ्यात अर्धा-पाऊण तास गेला. त्यानंतर आम्ही पुढे चालू लागलो.

वडवाणा गावात पोहोचलो. येथे शक्रेश्वर महादेव नावाचे पुरातन तीर्थ मैया किनारी होते. २०२३ मध्ये आलेल्या महापुरात हे तीर्थ वाहून गेले. तरीही आम्ही तिथे जाऊन दर्शन घेतले. भग्नावस्थेतील ते मंदिर पाहून खूप वाईट वाटले. 

तिथून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर शाश्वत मारुती धाम हे अलीकडे बांधलेले खूप मोठे मंदिर आणि आश्रम आहे. हजार-दोन हजार माणसे आरामात मावतील इतका मोठा हा आश्रम आहे. वडवाण्यातून मारुती धामकडे जाताना थोडासा जंगलरस्ता आहे. आम्ही तिघे चालत होतो. वाटेत एका ठिकाणी अगदी दहा-पंधरा फूट अंतरावर वनखात्याने वाघाला पकडण्यासाठी लावलेला पिंजरा आम्हाला दिसला. आम्ही तिथून चालत पुढे निघून गेलो.

मणिनागेश्वर: 'पंतप्रधान' बाबांचा सत्संग

शाश्वत मारुती धाममध्ये पोहोचलो, तिथे दर्शन घेतले आणि नवले महाराज पुढे निघाले. आम्ही त्यांच्या पाठोपाठ निघालो, पण ते दिसेनासे झाले. ते कुठे गेले याचा विचार करत असतानाच समोरून भगव्या कपड्यातील एक बाबाजी आले आणि त्यांनी, "चलो... चलो... चलो... आगे चलो... आगे चलो... इस रास्तेसे चलो," असे म्हणत आम्हाला पुढे हाकलले. ते आम्हाला मणिनागेश्वर या पुरातन तीर्थाकडे घेऊन गेले. आम्ही पाहिले तर नवले महाराज तिथे पोहोचलेच नव्हते. झाले असे की, नवले महाराज मारुती धाममध्येच बाजूला आमची वाट बघत थांबले, आणि हे बाबाजी आले व आम्हाला सरळ मणिनागेश्वरला घेऊन गेले. थोड्या वेळाने आमच्या पाठोपाठ नवले महाराजही तिथे आले.

मणिनागेश्वरचे हे बाबाजी देखील केरळमधील आहेत. त्यांचे बरेचसे आयुष्य मणिनागेश्वरमध्येच गेले आहे. सर्वसाधारणपणे संन्यासी म्हणजे काहीसा रुक्ष, अबोल असतो, असा सर्वसाधारण समज आहे. परंतु, हे बाबाजी मात्र खूपच आनंदी आणि विनोदी स्वभावाचे होते. नर्मविनोद सांगता सांगता त्यातून महत्त्वाचे तत्त्वज्ञान ते आमच्यापुढे मांडत होते. मणिनागेश्वराचा महिमा ऐकलेला असल्यामुळे मी तिथे गेल्यावर शिवतांडव स्तोत्राचा पाठ केला. त्यानंतर बाबांच्या सत्संगात येऊन बसलो. बाबाजींनी भंडारीबाबांना हाक मारली आणि चहा तयार करायला सांगितला. भंडारीबाबा म्हणाले, 'समोर किटलीमध्ये चहा आहे.' त्यावर बाबाजी म्हणाले, 'तसा नको... नवीन चहा तयार कर आणि मला दे, मीही घेणार आहे.' भंडारीबाबा आत निघून गेल्यावर डोळे मिचकवून महाराज म्हणाले, 'असं सांगितलं की तो चांगला चहा तयार करेल.'

ते आमच्याशी बोलत असताना त्यांच्याहूनही एक वयस्कर असे बाबाजी आले आणि ते बाजूच्या कक्षात निघून गेले. आमच्यापैकी एकाने बाबाजींना विचारले, 'हे बाबाजी कोण?' तर ते हसले आणि म्हणाले, "ते राष्ट्रपती आहेत, आणि मी पंतप्रधान आहे. मी त्यांच्या नावाने कारभार पाहतो." बाबाजींच्या या बोलक्या स्वभावामुळे त्यांचा सत्संग ऐकण्यास आम्हाला मजा वाटत होती. पण त्याचबरोबर त्यांची आध्यात्मिक बैठक किती पक्की आहे, हे त्यांच्या बोलण्यातून आम्हाला समजत होते. या आश्रमाला पुष्कळ शेतजमीन आहे, त्याची व्यवस्था बाबाजी पाहतात. हा आश्रम सेंद्रिय गूळ मोठ्या प्रमाणात तयार करतो, त्याला खूप मागणी आहे. या ठिकाणीही शेती असल्यामुळे पुष्कळ मोर होते.

थोड्या वेळाने भोजनप्रसादी तयार झाली. आम्ही भोजनप्रसादी घेतली. बाबाजींनी प्रत्येकाला ५० रुपये दक्षिणा दिली. आम्ही थोडा वेळ तिथे थांबून पुढे निघालो. रुंड गावातील गौतमेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन दुपारच्या सुमारास आम्ही भालोद येथे पोहोचलो.

अविधा: अखेर बँडेज तरी मिळाले

भालोदमध्ये शिरताना रस्त्यात प्राथमिक आरोग्य केंद्र दिसले. अनेक दिवसांनी सेप्टिक झालेल्या पायावर उपचार होण्याची शक्यता दिसल्याने आम्ही तिथे गेलो. पाहिले तर एक परिचारिका मोबाईलवर वेळ घालवत होती. डॉक्टर जागेवर नव्हते. आम्ही गेल्यावर तिने मोठ्या कष्टाने मोबाईलमधून मान वर केली. मी तिला माझ्या पायाची परिस्थिती सांगितली. त्यावर तिने पाय बघण्याचीही तसदी न घेता 'डॉक्टर नाहीत' असे सांगून विषय झटकून टाकला. मी तिला 'औषध मिळाले तर मी पायाचे ड्रेसिंग करून घेईन' असे म्हटले, तर ती म्हणाली, 'जखम साफ करण्यासाठीचे सोल्युशनही आमच्याकडे नाही.' वास्तविक पाहता त्याची बाटली मला समोर दिसत होती. एकूणच तिची भूमिका नकारात्मक असल्यामुळे आम्ही तिथून बाहेर पडलो. नवले महाराजांना यावेळी खूप संताप आला. ते म्हणाले, 'ही काय वागण्याची पद्धत झाली?' मी म्हटले, 'जाऊ द्या, आपले भोग आपण सहन करत पुढे चालायचे.'

आम्ही भालोद येथील प्रतापे महाराजांच्या दत्तमंदिराजवळ असलेल्या एका मंदिरात आमच्या पाठीवरील ओझे उतरून ठेवले. एकमुखी दत्ताचे दर्शन घेण्यासाठी गेलो. प्रतापे महाराज त्यावेळी झोपलेले होते. सुदैवाने एक माईजी तिथे होत्या. आम्ही दत्तदर्शन घेतले आणि परत येऊन आमच्या बॅगा घेऊन पुढे चालू लागलो.

भालोदमधून बाहेर पडता पडता एक वस्ती लागली. नवले महाराज आणि सत्संगी महाराज पुढे गेले होते. मी हळूहळू मागून चालत होतो. तितक्यात रस्त्याच्या बाजूला बसलेल्या दोन-तीन तरुणांपैकी एकाने 'बाबाजी रुको' असे म्हणत मला थांबवले. तो धावत धावत पुढे आला. तो जवळ येताच मद्याचा उग्र दर्प सर्वत्र पसरला. या मंडळींनी दुपारीच श्रमपरिहार करण्यास सुरुवात केली होती. त्या तरुणाने खिसे चाचपडून खिशातून एक पाच रुपयाचे नाणे काढले. ते माझ्या हातावर ठेवले आणि मला वाकून नमस्कार केला. तशा अवस्थेतही त्याची नर्मदा मैयाप्रती असलेली श्रद्धा कायम होती हे विशेष. मी पुढे चालू लागलो.

सायंकाळी आम्ही अविधा येथे रामेश्वर महादेव मंदिरात पोहोचलो. येथे पटेल धर्मशाळा आहे. या धर्मशाळेत आम्ही रात्री आसने लावली. गावकरी येथे सेवा देतात. मी तेथील गावकऱ्यांकडे बँडेज मिळेल का याची चौकशी केली. तेव्हा व्यवस्था पाहणाऱ्या एका तरुणाने दोन छोटी बँडेजेस मला उपलब्ध करून दिली. सुमारे दहा-पंधरा दिवसांनंतर जरा नीटपणे पायाची जखम बांधता आली. भोजनोत्तर आम्ही निद्राधीन झालो. पहाटे मंदिरांच्या घंटेचा आवाज येऊ लागला. गावकरी पहाटेपासूनच दर्शनाला येत होते. त्यात प्रामुख्याने महिला वर्ग होता.

सकाळी स्नानादी उरकून, पूजन करून आम्ही चहा घेतला आणि गावकऱ्यांना 'नर्मदे हर' करून पुढे चालू लागलो.

----------------------------------------

Labels: Marathi literature, Narmada Parikrama, spiritual journey, travelogue, human nature, divine guidance, physical hardship, selfless service, faith, resilience

Search Description: A Marathi spiritual travelogue detailing the journey from Indor to Avida. The author encounters a variety of people, from a jovial "prime minister" Baba to an apathetic nurse, and receives a profound lesson in faith from a young man under the influence. The narrative climaxes with a small act of kindness that finally allows the author to bandage a long-unhealed foot wound, highlighting the power of human compassion on the pilgrimage.

Hashtags: #NarmadaParikrama #SpiritualJourney #MarathiLiterature #Humanity #DivineGuidance #FaithAndDestiny #Pilgrimage #PhysicalHardship #UnwaveringFaith #SmallActsOfKindness

-------------------------------

नर्मदा परिक्रमा: निसर्ग, साहस आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_268.html

१ नर्मदा परिक्रमा : नर्मदे हर: एक आंतरिक आणि बाह्य प्रवास

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_517.html

२ नर्मदा परिक्रमा : चमत्कारांचा खजिना आणि एका दैवी प्रवासाची सुरुवात

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_243.html

३ नर्मदा परिक्रमा : आशीर्वाद आणि एक दैवी साखळी

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_418.html

४ नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वरची पहिली रात्र : अनपेक्षित घटना आणि संघर्ष

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_459.html

५ नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वर: परिक्रमेचा पहिला दिवस आणि त्यागाची पहिली शिकवण

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_214.html

६ नर्मदा परिक्रमा : रावेरखेडीकडे प्रस्थान आणि एक अनपेक्षित सहप्रवासी

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post.html

७ नर्मदा परिक्रमा : शालिवाहनकडे: एक आनंददायी अनुभव

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_16.html

मांडूतील नीलकंठेश्वर महादेव मंदिर: एक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अवलोकन

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_3.html

८ नर्मदा परिक्रमा : खलघाट: सेवाभावाचा एक अविस्मरणीय अनुभव

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_5.html

९ नर्मदा परिक्रमा : शूलपाणी: एक अदृश्य परीक्षा आणि अनपेक्षित मदत

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_7.html

१० नर्मदा परिक्रमा : शूलपाणीतील दहा दिवस: त्याग आणि सेवेचा खरा अनुभव

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_12.html

११ माझी परिक्रमा : धडगाव ते शूलपाणीश्वर: धडगावातील अनोखा अनुभव

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_13.html

नर्मदा परिक्रमा करताना....

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_15.html

१२ नर्मदा परिक्रमा : हरिधाम आश्रम ते तपोवन आश्रम; मेघनाद येथील मुक्काम

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_20.html

१३ नर्मदा परिक्रमा : पोइचा ते कार्तिकेश्वर: सेवेचे विविध रंग

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_22.html

----------------------------------

नर्मदा परिक्रमा व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये सामील होण्यासाठी 

मा रेवा... जिचे पाणी नाही, तर प्रेम आहे.

मा नर्मदा... जिची वाळू नाही, तर कणकण चैतन्य आहे.

जिच्या परिक्रमेचा अनुभव शब्दबद्ध करणे अशक्य आहे आणि तो फक्त परिक्रमावासीच समजू शकतात. ही परिक्रमा फक्त एक प्रवास नाही, तर एक अनुभूती आहे... एक साधना आहे... जेथे परिक्रमावासी आणि आई नर्मदा यांच्यातील नातं अधिक घट्ट होतं.

तुम्हीही या दिव्य अनुभवाचे साक्षीदार आहात का?

या समूहात तुम्ही सहभागी होऊ शकता, जर...

·         तुम्ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली असेल आणि तुमचा अनुभव इतरांसोबत वाटून घेण्याची तुमची इच्छा असेल.

·         तुम्ही नर्मदा परिक्रमा करण्याची योजना आखत असाल आणि त्यासाठी मार्गदर्शन, माहिती किंवा प्रेरणा शोधत असाल.

·         तुम्हाला नर्मदा खंडातील सेवाकार्यात (उदा. अन्नदान, आरोग्य सेवा, आश्रम व्यवस्थापन इ.) सहभागी होण्याची किंवा योगदान देण्याची इच्छा असेल.

·         तुम्ही असे व्यक्ती असाल ज्यांना नर्मदा नदी आणि तिच्या अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय महत्त्वाबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे.

हा समूह तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, कारण...

·         तुम्ही परिक्रमावासींचे अनुभव वाचू शकता, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता किंवा तुमचे प्रश्न विचारू शकता.

·         तुम्ही परिक्रमेसाठी आवश्यक माहिती, साधने आणि मार्गदर्शन मिळवू शकता.

·         तुम्ही नर्मदा खंडातील सेवाकार्यात सहभागी होण्यासाठी किंवा योगदान देण्यासाठी योग्य संधी शोधू शकता.

·         तुम्ही इतर परिक्रमावासी किंवा सेवाभावी व्यक्तींसोबत संवाद साधू शकता आणि एक सकारात्मक समुदाय तयार करू शकता.

या प्रवासाचा एक भाग बनण्यासाठी आणि नर्मदा मातेच्या सेवेसाठी एकत्र येण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत.

या पवित्र कार्यात सामील व्हा आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी हातभार लावा!

https://chat.whatsapp.com/Gnbvp5zPXXvER76ipmjhqi

 

 

 


१४ नर्मदा परिक्रमा : इंद्रेश्वर ते अविधा: सेवा आणि मानवी स्वभावाचे विविध रंग १४ नर्मदा परिक्रमा :  इंद्रेश्वर ते अविधा: सेवा आणि मानवी स्वभावाचे विविध रंग Reviewed by ANN news network on ९/२३/२०२५ ०५:४५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".