मेघनादहून बाहेर पडून आम्ही रस्त्याला लागलो. सकाळची वेळ होती, हवेत गारवा होता आणि अनेक मोर परिसरात बागडत होते. वातावरण अतिशय प्रसन्न होते. चालत चालत आम्ही कोठारा गावी पोहोचलो, जिथे एक मिरवणूक चालली होती. त्या लोकांनी आम्हाला वाट मोकळी करून दिली आणि 'नर्मदे हर' म्हटले. पुढे आम्ही हनुमंतेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. त्याच्या जवळच मोरली नदीचा मैयाशी संगम आहे.
त्यानंतर आम्ही पोईचा येथे दुपारच्या भोजनापर्यंत पोहोचलो. स्वामीनारायण पंथाने येथे अतिशय भव्य आणि देखणा असा मंदिर समूह निर्माण केला आहे. त्याच्या बाजूलाच अनेक दुकाने आणि राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. धर्म आणि व्यवसाय यांचा उत्तम मेळ येथे साधलेला दिसतो. बहुधा हे गुजरातचे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असावे, कारण शेकडो गाड्या आणि पर्यटकांची लगबग दिसत होती. आम्ही सर्व मंदिरांचे दर्शन घेतले. सोबतच्या वाती संपल्या होत्या, त्यामुळे आम्ही तिथेच त्या खरेदी केल्या. या मंदिर समूहातील वेदपाठशाळेच्या भोजनगृहात आम्ही परिक्रमावासी पंगतीत बसलो. आमच्यासोबत विद्यार्थीही होते. सुग्रास आणि सात्त्विक असे भोजन येथे आम्हाला मिळाले.
भोजनोत्तर, आम्ही विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर घेऊन पुढे चालू लागलो. पोईचा गाव मागे टाकून सायंकाळपर्यंत नलखेडी गावात पोहोचलो. तिथे नलेश्वर महादेवाचे मंदिर आहे, जिथे करजण नदीचा मैयाशी संगम होतो. या संगमाजवळील आश्रमात आम्ही आसने लावली. खरेतर तो आश्रम नव्हता, तर एका बाबाजींची एक छोटीशी कुटी, तितकीच छोटी रसोई आणि बाजूला एक शेड होती, जिथे गायी आणि अन्य पशूधन बांधले होते. तो गोठा होता. त्या गोठ्याच्या एका कोपऱ्यात आम्ही आसने लावली होती. सोबतचा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला त्याची कल्पना येईल.
मैयाचा प्रसाद: चहा-पोहे
रात्री भोजनप्रसादी घेतल्यानंतर आम्ही
झोपी गेलो. सकाळी लवकर उठून मैयाच्या किनाऱ्यावरून पुढे चालायला सुरुवात केली. काही
अंतर पार केल्यावर आम्हाला अचानक 'बाबाजी रुको! बाबाजी रुको!!' अशा हाका ऐकू येऊ लागल्या.
नीट पाहिले तर पलीकडच्या तीरावर एक तरुण मुलगा दोन पिशव्या घेऊन उभा होता. तो आम्हाला
हाताने थांबण्यासाठी इशारा करत होता. आम्ही थांबलो. तिथे एक होडी होती. एक नावाडी आला
आणि त्या होडीत बसून तो मुलगा अलीकडच्या तीरावर आम्ही जिथे उभे होतो तिथे आला.
त्याने 'नर्मदे हर' केले आणि म्हणाला, "बाबाजी, चायप्रसादी, बालभोग पा लो." त्याने आणलेल्या पिशव्यांमधून एक किटली आणि एक डबा काढला. गरमागरम पोहे आणि चहा त्याने आम्हाला दिला. सहज चौकशी केली असता, तो मुलगा महाराष्ट्रातील सोलापूरकडील असल्याचे समजले. तो म्हणाला, "पुण्यात कॉलेजचे शिक्षण घेत होतो. अचानक त्यात गोडी वाटेनाशी झाली, मग इथे आलो, या आश्रमात राहिलो आणि आता इकडेच आहे." त्याने आम्हाला परिक्रमेच्या काळात रोज तिकडून इकडे येऊन परिक्रमावासींना बालभोग देण्याची सेवा करतो असे सांगितले. "पुढे तुम्ही उत्तरतीरावर याल, तेव्हा आमच्या आश्रमात नक्की या," असे त्याने आग्रहाचे निमंत्रण दिले. त्याच्या आश्रमात अॅक्युप्रेशर, मसाज वगैरे मोफत सेवा दिली जाते असेही त्याने सांगितले. यामुळे सत्संगी महाराज खूपच उत्साहित झाले आणि त्यांनी उत्तरतीरावर गेल्यावर त्या आश्रमात जायचे असे ठरवले.
त्याचा निरोप घेऊन आम्ही पुढे शुकदेव
येथील पुरातन तीर्थस्थळाला भेट दिली. येथे जगात पहिल्यांदा भागवत सांगितले गेले. हे
खूप जुने देवस्थान आहे, पण त्याची काहीशी उपेक्षा झाल्याचे जाणवले. दर्शन घेऊन आम्ही
खाली उतरून मैयाच्या किनाऱ्याने पुढे चालू लागलो.
पाटणा येथील चंद्रकांतेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन पुढे ओरी येथे कोटेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. पुढे रस्त्याच्या कडेला बिलेश्वर आनंदाश्रम नावाचा एक आश्रम लागला. दुपारच्या भोजनाची वेळ झाली होती. येथील महाराज रस्त्यावर थांबून परिक्रमावासींना भोजनप्रसादी घेण्यासाठी बोलवत होते. आम्ही आश्रमात गेलो. तिथेकाही कामगार ऊसतोडणीचे काम करत होते. आणि; त्यांची लहान मुले मातीत खेळत होती. ती हळूच आमच्याकडे पाहत होती. आम्ही त्यांना बिस्किटांचे पुडे दिले, पण खरेतर त्यांना भूक लागली होती. बाबाजींनी 'भोजन की सिताराम' केली. आम्ही जेवून मोकळे झालो. त्यानंतर त्या बाबाजींनी त्या सगळ्या मुलांना हाक मारली. ती मुले मोठ्या आनंदाने उड्या मारत आत आली आणि त्यांची अंगतपंगत सुरू झाली. मैयाच्या परिक्रमेमुळे जीवनाचे हे विविध रंग जवळून पाहता येतात. एरवी शहरातील धावपळीच्या जीवनात जीवनाची अशी दुसरी बाजू कधी लक्षातही येत नाही.
ज्याचे त्याचे प्रारब्ध......
आम्ही सिसोदरा मार्गे पुढे चालत
होतो. सर्वात पुढे नवले महाराज, त्यांच्या मागे सत्संगी महाराज आणि सगळ्यात शेवटी पाठीवरचे
ओझे सांभाळत पाय ओढत मी चाललो होतो. हा डांबरी रस्ता होता, पण त्यावर वर्दळ खूप कमी
होती. समोरून एक पांढऱ्या रंगाची आलिशान गाडी आली आणि माझ्यासमोर थांबली. मी जरा दबकतच
पाहिले. गाडीत दोन माईजी बसल्या होत्या. त्यातील एका माईजींनी काच खाली केली आणि पन्नास
रुपयांची नोट दक्षिणा म्हणून मला दिली आणि नमस्कार केला. मीही त्यांना नमस्कार करून
'नर्मदे हर' म्हटले आणि पुढे चालू लागलो. मैयाच्या परिक्रमामार्गावर चालताना प्रत्येकाचे
अनुभव त्याच्या प्रारब्धाप्रमाणे कसे वेगवेगळे असतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. माझ्यापुढे
नवले महाराज आणि सत्संगी महाराज चालत होते, पण ती गाडी त्या दोघांजवळ न थांबता माझ्या
जवळ येऊन थांबली. कारण, मैयाची इच्छा!
थोड्या अंतरावर चालत गेल्यावर कार्तिकेश्वर
महादेव मंदिराकडे दिशानिर्देश करणारा फलक दिसला. आजचा मुक्काम येथेच होणार होता.
आम्ही आत वळलो. तिथे एक छोटेसे शिवमंदिर लागले. तिथे बसलेल्या बाबांनी 'आश्रम आगे है'
असे सांगितले. दर्शन घेण्यासाठी आलो असल्याचे त्यांना सांगितल्यावर ते काही बोलले नाहीत.
ते आणि एक अन्य बाबा 'शिवप्रिया गंधवल्ली'चे सेवन करत होते. त्यांच्या आनंदात जास्त व्यत्यय न
आणता आम्ही दर्शन घेऊन पुढे गेलो. तिथेच जवळच एक दर्गा आणि एक प्रचंड मोठे वडाचे झाड
होते. तो सर्व परिसर थोडा गूढ वाटत होता.
आम्ही पुढे जाऊन कार्तिकेश्वर महादेव आश्रमात पोहोचलो. आश्रमाच्या दोन बाबाजींनी 'नर्मदे हर' म्हणत स्वागत केले आणि आसने कुठे लावायची ते सांगितले. आश्रमाची व्यवस्था उत्तम होती. काही कपडे पिळायचे होते. मी आणि सत्संगी महाराजांनी कपडे धुतले. त्यानंतर सायंपूजा केली. भोजनगृहातील भंडारी बाबा बाहेर आले. "कोणी मदत करायला तयार आहे का? मला थोडी भाजी चिरून हवी आहे," असे ते म्हणाले. मी आणि नवले महाराज लगेच तिकडे गेलो, पण सत्संगी महाराजांच्या ते पचनी पडले नाही. त्यांनी थोडा वेळ काम केल्यासारखे दाखवले आणि तिथून काढता पाय घेतला.
भोजन की 'सीताराम' झाल्यावर आमची पंगत
बसली. यावेळी आश्रमातील महाराजांनी 'श्रीराम जय राम जय जय राम' ही रामनामाची धून आळवण्यास
सुरुवात केली. याआधी बहुतांश आश्रमात आम्ही 'सीताराम.. सीताराम..' असे काहीसे बेसूर
आवाजात गात असू, पण येथे त्यालाही एक शिस्त होती. या आश्रमाचे महाराज मूळचे केरळचे
असून गेले ४० वर्षे येथे आहेत. गावकरी मंडळी आम्हाला आग्रह करून भोजन वाढत होती. आश्चर्य
म्हणजे, या ठिकाणी सर्व परिक्रमावासींना प्रत्येकी एक ग्लास भरून दूध देण्यात आले.
संपूर्ण परिक्रमेत आम्हाला फक्त दोनच ठिकाणी दूध मिळाले. आश्रमाची स्वतःची गोशाळा असल्यामुळे
हे शक्य झाले असे महाराज म्हणाले.
रात्री थंडी कडाक्याची होती. आश्रमातील
एका बाबाजींनी आवारात शेकोटी पेटवली. थोडा वेळ शेकण्याचा आनंद घेतला. त्यानंतर आत जाऊन
झोपी गेलो.
या सर्व अनुभवकथनात मी एक गोष्ट सांगायची
विसरलो. बडवाणीच्या अलीकडे माझ्या उजव्या पायाच्या तळव्याला एक फोड आला. तो फुटला आणि
तिथे सेप्टिक झाले. जवळपास चवड्याचा अर्धा भाग खराब झाला होता. चालताना त्यातून पस बाहेर
पडत असे. या संपूर्ण टप्प्यात औषधपाण्याची सोय दिसली नाही. माझ्याकडेही काही औषध नव्हते.
त्यामुळे मी तसाच चालत होतो. एका ठिकाणी मोबाईल नेटवर्क आल्यावर मी माझे मित्र, डॉक्टर
रसाळ यांना कॉल करून पायाची परिस्थिती दाखवली. त्यांनी लगेच हातभर लांब प्रिस्क्रिप्शन
पाठवले आणि 'आठवडाभर एकाच ठिकाणी राहून आराम करा, पाय भिजवू नका, माती लागू देऊ नका'
अशा सूचना दिल्या. पण इथे किराणामालाचे दुकान दिसत नाही, तिथे औषधाचे दुकान कुठून येणार?
त्यामुळे पाय तसाच ओढत चालत होतो. कालांतराने सत्संगी महाराजांना त्यांच्या बॅगेत एक
छोटासा बँडेजचा तुकडा असल्याचे आठवले. त्यांनी तो मला दिला. तो पायाला गुंडाळून मी
चालत होतो. दुसऱ्या पायाला आणि याच पायाला बोटांच्या बेचक्यांमध्ये फोड आले होते. याशिवाय,
मागे घोट्याकडे सॅंडलचे पट्टे घासून जखमा झाल्या होत्या. एकूणच दोन्ही पाय जवळपास निकामी
झाले होते, पण काही झाले तरी थांबायचे नाही असा निर्णय मनाशी केला होता. या पायाच्या
जखमेवर उपचार करण्यासाठी औषधे कधी मिळाली हे मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन.
Marathi literature, Narmada
Parikrama, spiritual journey, travelogue, personal sacrifice, selfless service,
faith, divine intervention, physical hardship, introspection
#NarmadaParikrama #SpiritualJourney #MarathiLiterature #SelflessService #DivineGrace #NarmadaMaiya #FaithAndDestiny #Pilgrimage #PhysicalHardship #UnwaveringFaith
-------------------------------
नर्मदा परिक्रमा: निसर्ग, साहस आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_268.html
१ नर्मदा परिक्रमा : नर्मदे हर: एक आंतरिक आणि बाह्य प्रवास
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_517.html
२ नर्मदा परिक्रमा : चमत्कारांचा खजिना आणि एका दैवी प्रवासाची सुरुवात
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_243.html
३ नर्मदा परिक्रमा : आशीर्वाद आणि एक दैवी साखळी
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_418.html
४ नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वरची पहिली रात्र : अनपेक्षित घटना आणि संघर्ष
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_459.html
५ नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वर: परिक्रमेचा पहिला दिवस आणि त्यागाची पहिली शिकवण
https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_214.html
६ नर्मदा परिक्रमा : रावेरखेडीकडे प्रस्थान आणि एक अनपेक्षित सहप्रवासी
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post.html
७ नर्मदा परिक्रमा : शालिवाहनकडे: एक आनंददायी अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_16.html
मांडूतील नीलकंठेश्वर महादेव मंदिर: एक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अवलोकन
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_3.html
८ नर्मदा परिक्रमा : खलघाट: सेवाभावाचा एक अविस्मरणीय अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_5.html
९ नर्मदा परिक्रमा : शूलपाणी: एक अदृश्य परीक्षा आणि अनपेक्षित मदत
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_7.html
१० नर्मदा परिक्रमा : शूलपाणीतील दहा दिवस: त्याग आणि सेवेचा खरा अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_12.html
११ माझी परिक्रमा : धडगाव ते शूलपाणीश्वर: धडगावातील अनोखा अनुभव
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_13.html
नर्मदा परिक्रमा करताना....
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_15.html
१२ नर्मदा परिक्रमा : हरिधाम आश्रम ते
तपोवन आश्रम; मेघनाद येथील मुक्काम
https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_20.html
----------------------------------
नर्मदा परिक्रमा व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये सामील होण्यासाठी
मा रेवा... जिचे पाणी नाही, तर प्रेम आहे.
मा नर्मदा... जिची वाळू नाही, तर कणकण चैतन्य आहे.
जिच्या परिक्रमेचा अनुभव शब्दबद्ध करणे अशक्य आहे आणि तो फक्त परिक्रमावासीच समजू शकतात. ही परिक्रमा फक्त एक प्रवास नाही, तर एक अनुभूती आहे... एक साधना आहे... जेथे परिक्रमावासी आणि आई नर्मदा यांच्यातील नातं अधिक घट्ट होतं.
तुम्हीही या दिव्य अनुभवाचे साक्षीदार आहात का?
या समूहात तुम्ही सहभागी होऊ शकता, जर...
· तुम्ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली असेल आणि तुमचा अनुभव इतरांसोबत वाटून घेण्याची तुमची इच्छा असेल.
· तुम्ही नर्मदा परिक्रमा करण्याची योजना आखत असाल आणि त्यासाठी मार्गदर्शन, माहिती किंवा प्रेरणा शोधत असाल.
· तुम्हाला नर्मदा खंडातील सेवाकार्यात (उदा. अन्नदान, आरोग्य सेवा, आश्रम व्यवस्थापन इ.) सहभागी होण्याची किंवा योगदान देण्याची इच्छा असेल.
· तुम्ही असे व्यक्ती असाल ज्यांना नर्मदा नदी आणि तिच्या अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय महत्त्वाबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे.
हा समूह तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, कारण...
· तुम्ही परिक्रमावासींचे अनुभव वाचू शकता, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता किंवा तुमचे प्रश्न विचारू शकता.
· तुम्ही परिक्रमेसाठी आवश्यक माहिती, साधने आणि मार्गदर्शन मिळवू शकता.
· तुम्ही नर्मदा खंडातील सेवाकार्यात सहभागी होण्यासाठी किंवा योगदान देण्यासाठी योग्य संधी शोधू शकता.
· तुम्ही इतर परिक्रमावासी किंवा सेवाभावी व्यक्तींसोबत संवाद साधू शकता आणि एक सकारात्मक समुदाय तयार करू शकता.
या प्रवासाचा एक भाग बनण्यासाठी आणि नर्मदा मातेच्या सेवेसाठी एकत्र येण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत.
या पवित्र कार्यात सामील व्हा आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी हातभार लावा!
https://chat.whatsapp.com/Gnbvp5zPXXvER76ipmjhqi

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: