'फेक नरेटिव्ह' विरोधात हिंदूंनी जागरूक राहावे, हिंदु जनजागृती समितीचे आवाहन
छत्रपती शिवाजी महाराजांना 'सेक्युलर' दाखवण्याचा कट; बाजीराव बांगर महाराजांचा आरोप
‘धर्म वाचवण्यासाठी एकत्र या’, मान्यवरांनी दिले आवाहन
संत तुकाराम महाराजांचे वंशज, माजी सनदी अधिकारी आणि ४०० हून अधिक वारकरी उपस्थित
आळंदी (जिल्हा पुणे) - सध्या धार्मिकता आणि आधुनिकतावाद यांमध्ये संघर्ष चालवला जात आहे. आताच्या माहितीयुगात आपण आपल्या मोबाईलमध्ये येणारी माहिती खरी आहे का ? योग्य आहे का ? याची खात्री करत नाही. त्यामुळेच ‘खोटे नरेटिव्ह’ (खोटे कथानक) बनवले जातात आणि पसरवले जातात. सध्या ‘चॅट जी.पी.टी.’सारख्या ‘ए.आय.’चा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर चुकीची माहिती पसरवण्यासाठी केला जात आहे. आजच्या जगात चुकीची माहिती पसरवणे हे सर्वात मोठे शस्त्र म्हणून वापरले जाते. तरी यापुढील काळात हिंदूंनी जागरूक होऊन वारकरी संप्रदाय अन् हिंदु धर्मविरोधी ‘फेक नरॅटिव्ह’ हाणून पाडावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.
आळंदी येथील फ्रुटवाले धर्मशाळा येथे २० सप्टेंबर या दिवशी ‘वारकरी आणि धार्मिक शिक्षण संस्था’ यांचे संमेलन उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात पार पडले. त्या वेळी ते बोलत होते. ‘सनातन विद्या फाऊंडेशन’, ‘हिंदु जनजागृती समिती’, ‘राष्ट्रीय वारकरी परिषद’ आणि ‘स्वराज्य संघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक फाऊंडेशनचे श्री. प्रकाश लोंढे यांनी केले. या संमेलनासाठी माजी सनदी अधिकारी (IAS) आणि ‘चाणक्य मंडल’चे श्री. अविनाश धर्माधिकारी, हिंदु जागरण मंचचे डॉ. अंकुश अगरवाल, महाराष्ट्र राज्य वारकरी मंडळाचे ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी, विश्वविक्रमी-शिव व्याख्याते ह.भ.प. बाजीराव बांगर महाराज, प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचे पिठासन धर्माधिकारी श्री. प्रसाद पंडित गुरुजी, ह.भ.प. माणिक महाराज मोरे, श्री. गिरीशभाऊ कारेकर, ह.भ.प. बाळासाहेब शेळके, प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. संजयशेठ थोरात, ह.भ.प. बाळासाहेब मोरे, ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर, ह.भ.प. संग्रामबापू भंडारे, ह.भ.प. घुंडरे पाटील महाराज, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर यांसह ४०० हून अधिक वारकर्यांची उपस्थिती होती.
तुम्हाला धर्मापासून दूर करायचे षड्यंत्र चालू आहे ! - श्री. अविनाश धर्माधिकारी (IAS)
‘सर्वेत्र सुखीनः सन्तु’, हे केवळ हिंदु धर्मात आहे, अन्य पंथात हे नाही. इतर पंथ ‘केवळ आमचाच ईश्वर खरा आहे, तुमचा धर्म खोटा, मागासलेला आहे’, असे म्हणतात. तुम्हाला तुमच्या धर्मापासून दूर करायचे किंवा मारून टाकायचे असेच षड्यंत्र चालू आहे. यासाठी जागतिक शक्तींकडून त्यांना आर्थिक पुरवठा होत आहे. जर सर्व जगात सुख शांती नांदायला हवी असेल, तर हिंदु धर्मच हे देऊ शकतो, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.
जिहादी षड्यंत्राच्या विरोधात कीर्तनकारांनी प्रबोधन करावे ! - डॉ. अंकुश अगरवाल
जिहादींनी गणेशोत्सवात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर आक्रमण केले. आषाढी वारीत खोटे फलक लावले, वारीतील वारकर्यांवर मांसाचे तुकडे फेकले गेले, ‘भजन, कीर्तन आणि आरती करायची नाही’, असे काही जिहादी जेथे त्यांची बहुसंख्याने वस्ती आहे अशा ठिकाणी सांगत आहेत. या षड्यंत्रांच्या विरोधात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांनी प्रत्येक कीर्तनात जनतेचे प्रबोधन करावे.
छत्रपती शिवाजी महाराजांना सेक्युलर दाखवण्याचे खोटे कथानक पसरवले जात आहे! - ह.भ.प. बाजीराव बांगर महाराज, विश्वविक्रमी-शिव व्याख्याते
पाच पातशाह्यांच्या जुलमी अत्याचाराला विरोध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी बालवयातच स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यासाठी त्यांनी अवघ्या १० जणांना घेऊन पुढे त्यांनी हिंदूंचे मोठे स्वराज्य उभे केले. यात लाखोचे सैन्यदल, मोठे हेर खाते होते. असे असतांना छत्रपती शिवाजी महाराजांना आता ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) दाखवण्याचे षड्यंत्र चालू आहे. त्यात मदरी मेहतरचे पात्र जोडले जात आहे. अशी अनेक खोटी कथानके पसरवली जात आहेत. हे सर्व कोण करत त्याची चौकशी केली पाहिजे आणि ते हाणून पाडले पाहिजे.
‘धर्मासाठी जगा आणि धर्मासाठी मरा’, ही शिकवण आचरणात आणण्याची आवश्यकता! - ह.भ.प. माणिक महाराज मोरे, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे १० वे वंशज
‘धर्माचे कारण करणे पाखंड खंडण’, असे जरी असले तरी हिंदू कधी पाखंड खंडण करत नाही. १२ व्या शतकापासून हिंदूंवर अनेक आक्रमणे होत आहेत. त्या वेळी १३ व्या शतकात संत ज्ञानेश्वर माऊलींनी भागवत धर्माचा पाया रचला, तर १६ व्या शतकात संत तुकाराम महाराज यांनी भागवत धर्माची वाढ करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. त्याप्रमाणे ‘धर्मासाठी जगा आणि धर्मासाठी मरा’, ही शिकवण आज आचरणात आणण्याची आवश्यकता आहे.
मंदिरांचे विश्वस्तांनी रामायणातील भरताप्रमाणे असावे ! - श्री. दिलीप देशमुख, माजी धर्मादाय आयुक्त
मंदिरांचे विश्वस्त म्हणजे रामायणातील भरतासारखे असावेत. भरताप्रमाणे कारभार चालवावा. भरताने ज्याप्रकारे राज्य कारभार केला त्याप्रमाणे विश्वस्तांनी संस्था चालवल्या, तर सर्वच संस्था चांगल्या चालतील.
काही लोक अर्बन नक्षलवादी बनून हिंदु धर्म संपवण्याचे कारस्थान करत आहेत !
-श्री. सुनील घनवट, राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती
हिंदु धर्मातील काही लोक अर्बन नक्षलवादी बनून हिंदु धर्म, वारकरी संप्रदाय संपवण्याचे कारस्थान करत आहेत. गेली काही वर्षे पंढरीच्या वारीत तथाकथित ‘समता दिंडी’ काढून त्यात अर्बन नक्षलवाद्यांना विषय मांडण्यासाठी संधी दिली जात आहे. या माध्यमांतून वारीत संत, वारी आणि धर्म यांविषयी चुकीची माहिती पसरवली जात आहे. याला आमचा विरोध आहे. या वेळी सर्व उपस्थितांनीही हात उंचावून ‘आम्ही हे चालू देणार नाही’, असे एकमुखाने सांगितले.
तर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीच्या विश्वस्त अधिवक्ता रोहिणी पवार म्हणाल्या की, कोणत्याही संघटनेचे कार्य चालू ठेवायचे असेल, तर आर्थिक साहाय्य लागते. धर्मादाय आयुक्त कार्यालयातून संस्था नोंदणीकृत झाल्यावर वारकरी संस्था, भजनी मंडळ, दिंड्या यांना साहित्य खरेदी करण्यासाठी या निधीचा उपयोग होऊ शकतो.
तर लेखा परिक्षक (CA) श्री. राम डावरे म्हणाले की, निधी मिळण्याविषयी सरकारने केलेले कायदे वारकरी संप्रदायासाठी थोडे शिथिल करण्याची आवश्यकता आहे. ‘वारकरी मुक्त विद्यापीठ’ स्थापन करून शिक्षण देण्याची आवश्यकता आहे.
Hindu Dharma, Warkari Sampraday, Religious Conference, Alandi, Hindu Janajagruti Samiti
#Alandi #Warkari #Hinduism #FakeNarratives #HinduJanajagrutiSamiti #Pune #Dharma

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: