भारताचा गौरवशाली इतिहास मुलांना कळावा हाच 'विजय दिना'चा मुख्य उद्देश : मंत्री मंगलप्रभात लोढा (VIDEO)

 


पुणे, दि. २६ जुलै २०२५: भारताचा इतिहास हा गौरवशाली इतिहास असून, मुलांना तो समजल्याशिवाय त्यांच्या मनात देशप्रेमाची भावना निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. 'आयटीआय'मध्ये (ITI) प्रथमच 'विजय दिवस' साजरा केला जात असून, भारताचा गौरवशाली इतिहास मुलांना कळावा हाच 'विजय दिना'चा मुख्य उद्देश आहे, असेही ते म्हणाले.

लोणावळा येथील क्रांतीकारक लहुजी साळवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (Government Industrial Training Institute - ITI) 'विजय दिवस' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या प्राचार्य प्रतिभा चव्हाण, पुणे प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक चंद्रशेखर ढेकणे आदी उपस्थित होते.

देशप्रेमाचे महत्त्व आणि प्रशिक्षणाचा दर्जा

मंगलप्रभात लोढा पुढे म्हणाले, "इस्त्राईल लहान देश असला तरी प्रत्येक नागरिकांमध्ये देशप्रेमाची भावना असल्यामुळे तो लढतो आणि जिंकतो आहे. देशासाठी लढणाऱ्यांच्या इतिहासाबाबतची माहिती जागोजागी प्रदर्शित केली पाहिजे." लोणावळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये १४ विविध प्रकारचे कोर्सेस सुरू असून, अजून छोटे कोर्सेस सुरू करण्याचा विचार आहे. विद्यार्थ्यांना बोलते करून त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही तसेच कुशल प्रशिक्षकांकडून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. लोणावळा येथे पर्यटनासाठी मोठ्या संख्येने लोक येत असल्यामुळे, विद्यार्थ्यांनी हॉस्पिटॅलिटी व्यवसायात (Hospitality business) पुढे येणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा

माजी सैनिक महेश थत्ते यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "कारगिलच्या लढाईने देशाला नेहमी युद्धासाठी सज्ज राहावे असा संदेश दिला. या युद्धामुळे भारताची प्रगल्भता वाढली असून, भारताला एक चांगला युद्धाचा अनुभव मिळाला आहे." त्यांनी कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा दिला. लेखिका व साहित्यिक मंजुश्री मंगल प्रभात लोढा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाची रूपरेषा

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटनिदेशक श्री. पासलकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन कुमारी श्रेया चामरे यांनी केले. याप्रसंगी लोणावळा परिसरातील माजी सैनिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला क्रांतीकारक लहुजी साळवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे निदेशक, कर्मचारी, विद्यार्थी व माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारताचा गौरवशाली इतिहास मुलांना कळावा हाच 'विजय दिना'चा मुख्य उद्देश : मंत्री मंगलप्रभात लोढा (VIDEO) भारताचा गौरवशाली इतिहास मुलांना कळावा हाच 'विजय दिना'चा मुख्य उद्देश : मंत्री मंगलप्रभात लोढा (VIDEO) Reviewed by ANN news network on ७/२६/२०२५ ०९:२८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".