पुणे जिल्ह्यात धरणं भरली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; चासकमान, निरा देवघर आणि भाटघर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला
पुणे, दि. २६ जुलै २०२५: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर चासकमान, निरा देवघर आणि भाटघर धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून, नदीकाठच्या गावांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
चासकमान धरण: भीमा नदीत विसर्ग वाढवला
चासकमान पाटबंधारे विभाग, पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने धरणात पाण्याची आवक (येवा) वाढली आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी:
सध्या भीमा नदीपात्रामध्ये सुरू असलेला ५१५० क्युसेक विसर्ग वाढवून सायंकाळी ५ वाजता ७७८० क्युसेक करण्यात आला.
या व्यतिरिक्त अतिवाही (overflow) द्वारे ४०० क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे, त्यामुळे एकूण ८१८० क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू राहील.
पावसाच्या प्रमाणानुसार आणि येव्यानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त होण्याची शक्यता आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे कार्यकारी अभियंता मो. ता. जाधवर यांनी कळवले आहे.
निरा देवघर धरण: ३,४८४ क्युसेक विसर्ग सुरू
पुणे पाटबंधारे विभाग, पुणे यांनी जाहीर केलेल्या सूचनेनुसार, भोर तालुक्यातील निरा देवघर धरणाच्या पाणी पातळीतही वेगाने वाढ होत आहे. आज, २६ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ४:३० वाजता धरण ८४.५३% भरले होते.
धरणातील आवकेचे प्रमाण लक्षात घेता, सायंकाळी ०६:०० वाजता धरणाच्या सांडव्याद्वारे नदीपात्रामध्ये ३,४८४ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
भाटघर धरण: ९५% भरले; विसर्ग वाढण्याची शक्यता
पुणे पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाटघर धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ झाली आहे. आज सायंकाळी ०५:०० वाजता भाटघर धरण ९५% भरले होते, तर निरा देवघर धरण ८४.५३% भरले होते.
पावसाच्या प्रमाणानुसार भाटघर आणि निरा देवघर धरणांच्या विसर्गांमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते, असे कार्यकारी अभियंता इंजि. दि. म. डुबल यांनी कळवले आहे.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
कार्यकारी अभियंता दि. म. डुबल आणि मो. ता. जाधवर यांनी सर्व नागरिकांना विनंती केली आहे की:
कृपया नदीपात्रात उतरू नये.
नदीच्या पात्रात कुठल्या विभागाचे काम सुरू असेल, तर त्या विभागाने बांधकाम साहित्य व कामगार यांना सुरक्षित ठिकाणी हलवावे.
नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नदीपात्रात पिण्याच्या व शेतीसाठी असलेले पंप सुरक्षित ठिकाणी हलवावे.
सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात आणि उचित कार्यवाही करावी.
सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.
या धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीकाठच्या सखल भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
Reviewed by ANN news network
on
७/२६/२०२५ ०८:५५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: